नागपूर : राज्यभर गाजत असलेल्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर शाखेने बुधवारी मोठी कारवाई पदाचा गैरवापर करत शासनाची १०० कोटी रुपयांची आर्थिक फसवूणक केल्याच्या आरोपात शिक्षणाधिकारी रोहिणी विठोबा कुंभार (माध्यमिक) आणि सिद्धेश्वर श्रीराम काळुसे (प्राथमिक) यांना अटक केली आहे. या दोघांच्या अटकेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
सायबर शाखेने यापैकी कुंभारला विमानतळावरून अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी दोघांनाही तडक प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही ६ ऑगस्टपर्यंत ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली. या घोटाळा प्रकरणात शिक्षणाधिकाऱ्यांवरील कारवाईची प्रक्रिया गेल्या अनेक महिन्यांपासून रेंगाळली होती. त्यामुळे दोघांवरही अटकेची टांगती तलवार होती. त्यामुळे बुधवारी दोन्ही विद्यमान शिक्षणाधिकाऱ्यांना झालेली अटक ही मोठी कारवाई मानली जात आहे.
विशेष म्हणजे, मधल्या काळात हे दोघेही शिक्षणाधिकारी एकाच वेळी फरार झाले होते. त्यामुळे या दोघांवर पुन्हा संशय उपस्थित केला जात आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने शालार्थ ओळखपत्राचे आदेश काढलेले नसतानाही या दोघांनी पदाचा गैरवापर करीत ओळखपत्राचे बनावट ‘ड्राफ्ट’ तयार करून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याची प्रक्रिया केली. त्यामुळे शासनाची १०० कोटी रुपायंपेक्षा अधिक फसवणूक झाल्याचा ठपका या दोघांवर ठेवण्यात आला आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीच्या आधारे सायबर शाखेने हा तपास केला.
कुंभारकडून २४४ तर काळुसेकडून १५४ बनावट शालार्थ आयडी
रोहिणी कुंभार या २०२४ पर्यंत प्राथमिक विभागात शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. सध्या त्या माध्यमिक शिक्षणाधिकारी आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी असताना २४४ शिक्षकांचे बनावट शालार्थ आयडी तयार केल्याचा आरोप आहे. तर सिद्धेश्वर काळुसेने १५४ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बनावट शालार्थ आयडीद्वारे वेतनाची प्रक्रिया मंजूर केली असा आरोप आहे. यातून या दोघांनीही शासनाची १०० कोटी रुपयांनी फसवणूक केल्याचे सायबर शाखेने केलेल्या तपासातून समोर आले. नवप्रविष्ट शिक्षकांचे मूळ शालार्थ आदेश निघालेले नसतानाही या दोघांनी वेतनासंबंधीची प्रक्रिया राबविल्याने शासनाची फसवणूक झाल्याचे सायबर शाखेने केलेल्या तपासातून निष्पन्न झाले. त्यामुळे या दोघांवरही अटकेची टांगती तलवार होती. अखेर सायबर शाखेने बुधवारी त्यांना अटक करीत न्यायालयासमोर उभे केले.
अटकेतील आरोपींची संख्या २६ वर
शालार्थ ओळखपत्र घोटाळा प्रकरणात विशेष तपास पथकासह सायबर शाखा देखील समांतर तपास करीत आहे. या दोन्ही तपास यंत्रणांनी मिळून आतापर्यंत २६ जणांना अटक केली आहे. सायबर सेलने या प्रकरणात आतार्यंत ११ तर विशेष तपास पथकाने १५ जणांना अटक केली आहे. या प्रकरणात यापूर्वी नरड, नाईक आणि वंजारी या तिघांवर दोन्ही तपास पथकाने संयुक्त कारवाई केली आहे.