गेल्या तीन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पूरस्थिती आहे. प्रकृती खालावूनही पुरामुळे उपचारासाठी बाहेर पडू न शकणाऱ्या ९० वर्षीय वृद्धेसह आठ रुग्णांना बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढून उपचारासाठी दाखल केले. हे बचाव कार्य वणी तालुक्यातील कवडशी या गावात आज बुधवारी सकाळी करण्यात आले.

हेही वाचा >>> नागपूर : जिल्ह्यात लंपी आजाराचा प्रादुर्भाव ; पाच किलोमीटर परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कवडशी गावाचा पुरामुळे संपर्क तुटला आहे. गावातील मीरा सीताराम हेपट (९०) या वृद्ध महिलेची प्रकृती अचानक गंभीर झाली. मात्र पुराच्या पाण्यामुळे गावातून बाहेर पडणे शक्य नव्हते. मीराबाईला उपचारासाठी तत्काळ दाखल करणे आवश्यक होते. ही बाब तालुका प्रशासनास कळविण्यात आली. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून आपत्ती निवारण कक्षातील बचाव पथकास समग्रीसह गावात पाचारण केले. या पथकाने आज, बुधवारी सकाळी कवडशी गावात ‘रेस्क्यू ऑपरेशन’ राबवून प्रकृती खालावलेल्या मीराबाईसह गावातील वृषभ उराडे (५), पूजा उराडे (२६), शालू गोबाडे (४५), रमेश काकडे (३०), गजानन काकडे (५०), अमोल मत्ते (३५), निरुपा मत्ते (१५) या रुग्णांना पुरातून सुखरूप बाहेर काढून वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या सर्व रुग्णांवर उपचार सुरू असून प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. दरम्यान आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाने उसंत घेतली आहे.