नागपूर : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयीन कार्यवाहीदरम्यान झालेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा मी तीव्र निंदा करतो. हा प्रकार केवळ एका व्यक्तीवर नाही, तर तो भारतीय न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाही मूल्यांवर थेट आघात आहे, अशा शब्दात शिवसेना गटाचे माजी खासदार व विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांनी निषेध व्यक्त केला.

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा त्यांनी समाजमाध्यमावर निषेध नोंदविला. ते म्हणाले की, भर न्यायालयात एका वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न हा अत्यंत लाजीरवाणा आणि खेदजनक आहे. अशा प्रकारचे कृत्य करणे हे संविधानविरोधी आहे. न्यायमूर्ती भूषण गवई हे संविधानाचे निष्ठावंत रक्षक आणि समाजातील सर्व घटकांना समान न्याय देण्याचे कार्य सतत करत आले आहेत, अशी प्रतिक्रिया तुमाने यांनी दिली. तुमाने यांनी सरन्यायधीश गवई यांना पूर्ण पाठिंबा व्यक्त करताना त्यांनी या घटनेला ज्या संयमाने, शिस्तीने आणि न्यायनिष्ठ भूमिकेने हाताळले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी सुनावणी चालू असताना वकील राकेश किशोर तिवारी या ७१ वर्षाच्या वकिलाने सरन्यायाधीश गवई यांच्या समोर जाऊन आपल्या पायातील बूट काढले आणि त्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तत्काळ हस्तक्षेप करून हा हल्ला रोखला, असे प्रत्यक्षदर्शी वकिलांनी माध्यमांना सांगितले. तसेच कोर्टरूम बाहेर सुरक्षा रक्षकांनी आणल्याने हल्लेखोर वकीलाने “सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही” अशी घोषणा दिल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर राज्यभरात वकील संघटना, कायदे व्यावसायिक आणि सार्वजनिक नेते यांनी तीव्र निंदा केली. बार कौन्सिल ऑफ इंडिया ने या वकीलाविरुद्ध शिस्तभंगाच्या कारवाईची प्रक्रिया सुरु केली आहे. हल्लेखोरी वकीलावर तातडीने त्यांची प्रॅक्टिस स्थगित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. काही वृत्तांनुसार, सर्वोच्च न्यायालयाचा रजिस्ट्रार जनरल यांनी त्या वकिलावर त्वरित गुन्हा दाखल न करण्याचा निर्णय घेतल्याचेही सांगितले आहे.

या घटनेमुळे न्यायसंस्थेतील सुरक्षा वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनंतर राज्यात ठिकठिकाणी हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी होत आहे. तसेच अशाप्रकारे मनुवादी प्रवृत्तीचा लोकशाही आणि न्यायव्यस्थेवर विश्वास नाही. त्यामुळे या प्रवृत्तींना डोकेवर काढण्याची संधी दिल्यास अराजक माजेल, असेही काहींचे म्हणणे आहे.