नागपूर : हवामान खात्याने राज्यातील काही भागांत मोसमी पाऊस पोहोचल्याची घोषणा केली. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून पडणारा पाऊस मोसमी नव्हे, तर त्यापूर्वी पडणारा वळिवाचा पाऊस आहे, असे निरीक्षण ब्रिटनमधील नॅशनल सेंटर फॉर अॅटमॉस्फेरिक सायन्स येथील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी नोंदवले.
डॉ. देवरस म्हणाले, केरळात मोसमी पावसाची घोषणा करताना निकष पाहिले जातात. ज्यात वाऱ्याची दिशा आणि गती, ढगांची तीव्रता आणि पावसाच्या व्याप्तीसह त्याचे प्रमाणही पाहिले जाते. मात्र, एकदा मोसमी पाऊस केरळकडून पुढे सरकला की वाऱ्यांच्या दिशेवर तितके लक्ष ठेवले जात नाही. २७ मेच्या स्थितीनुसार, मोसमी पावसाचे वारे दक्षिण कोकण आणि दक्षिण भारतातील बऱ्याच भागात दाखल झाले आहेत. मात्र, २६ मे रोजीच मोसमी पाऊस मुंबईसह पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात दाखल झाल्याची घोषणा करण्यात आली. हवामान खात्याची विविध प्रारूपे आणि मुंबईस्थित असलेले ‘डॉप्लर रडार’सुद्धा हे दाखवत आहेत की, या भागात जमिनीपासून सुमारे पाच हजार फुटाच्या उंचीपर्यंत येणारे वारे पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिमेकडून येत नसून ते उत्तर-पश्चिम दिशेकडून येत आहेत. गोव्यासारख्या ठिकाणी पोहोचणारे तेच वारे दक्षिण गोलार्धामधून विषुववृत्त ओलांडून येत आहेत आणि ते मोसमी पावसाचे वारे आहेत.
दहा जूननंतरच पाऊस
प्रत्यक्षात २८ मेपासून राज्यातील हवामान हळूहळू कोरडे होण्यास सुरुवात होणार आहे. सहा ते सात जूनपर्यंत पाऊस थांबणार आहे. त्यामुळे तापमानात पुन्हा एकदा वाढ दिसून येईल. प्रत्यक्षात राज्यातील बहुतांश भागात दहा जूनच्या आधी तरी मोसमी पाऊस दाखल होणार नाही, असेही अक्षय देवरस यांनी सांगितले.
घोषणेची घाई
वाऱ्याची दिशा आणि त्याच्या गतीत होणाऱ्या बदलावरून मोसमी पाऊस ओळखला जातो. हा बदल तात्पुरता, काही दिवस नाही तर सुमारे सहा महिने (मे-ऑक्टोबर) दिसून येतो. या बदलामुळे दक्षिण गोलार्धामधील भारतीय समुद्रावरून विषुववृत्त ओलांडून भारताकडे वारे येतात. ते आर्द्रता आणतात आणि त्यामुळे भारतात पडणाऱ्या एकूण पावसाच्या ७५ टक्क्यांहून अधिक पाऊस जून ते सप्टेंबरमध्ये या केवळ चार महिन्यांत पडतो. म्हणूनच त्याला र्र्नैऋत्य मोसमी पाऊस म्हणतात. मोसमी पावसाच्या घोषणेची घाई केल्यामुळे त्याची खरी ओळख हिरावण्याची भीती आहे, असेही डॉ. देवरस म्हणाले.
लवकर दाखल होऊन मान्सूनने सुरुवातीच्या काळात मोठे क्षेत्र व्यापणे हे काही नवीन नाही. १९७१मध्येही मान्सूनने सुरुवातीच्या टप्प्यात कर्नाटक, महाराष्ट्राचा मोठा भाग व्यापला होता. सध्या असलेली स्थिती २ जूनपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि पूर्वेकडील भागात मान्सूनचा प्रवेश लवकर होऊ शकेल. मात्र, त्यानंतर मान्सूनचा वेग मंदावून काही काळ विराम येऊ शकतो.-डॉ. एम. राजीवन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ