बुलढाणा : शासकीय शाळा समोरील इंग्रजी शाळांचे आव्हान आता खेड्यातही उभे ठाकले आहे.यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांना पट संख्या राखणे वा पुरेशा संख्येतील विध्यार्थी मिळणे देखील आता अवघड झाले आहे.मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांना यासाठी अनेक कसरती कराव्या लागतात. हे नेहमीचे चित्र ठरले आहे. खासगी शाळांमध्ये मिळणाऱ्या सुविधामुळे पालक वर्ग आपल्या मुलांना खासगी शाळांमध्ये टाकत आहे.या स्पर्धेत टिकण्यासाठी आणि शाळा वाचविण्यासाठी शाळांना धडपड करावी लागते. मात्र बुलढाणा तालुक्यातील भडगाव ग्रामपंचायतीने देखील ‘झेडपी’ ची शाळा वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.भडगाव ग्रामपंचायतीने यासाठी एक ‘ऑफर’ देऊ केली आहे.

यात जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतल्यास घरपट्टी आणि पाणी कर माफ करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे.बुलढाणा तालुक्यातील भडगाव गावात १९३२ पासून जिल्हा परिषद मराठी पूर्व माध्यमिक शाळा सुरू आहे. वर्ग १ ते ७ वर्ग पर्यंत मराठी माध्यम सुरळीत सुरू होते. त्यातून अनेक विद्यार्थी घडले आहेत. मात्र आजच्या स्पर्धेच्या युगात शाळा बंद पडण्याच्या स्थितीत आली आहे. शाळेत विद्यार्थी मिळणे देखील कठीण झाले असून जिल्हा परिषदेची शाळा कायम सुरु राहावी; यासाठी भडगाव ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे.

शाळेत केवळ २९ विद्यार्थी

आज खासगी अनुदानित व विना अनुदानित शाळा तसेच इंग्लिश मिडीयम शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यात परिषदेच्या शाळा मागे पडत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. अर्थात खासगी शाळांमध्ये असलेल्या सुविधा यामुळे पालक वर्ग पाल्याना जिल्हा परिषद शाळांऐवजी खासगी शाळेत टाकत असतो. यामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये पटसंख्या कमी होत आहे. अशाच प्रकारे भडगाव येथील शाळेत पहिली ते चौथी या वर्गात मिळून केवळ २९ विद्यार्थी संख्या आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

…तर कर माफ

शाळा टिकविण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे. यात आपल्या मुलामुलीना जर स्थानिक जिल्हा परिषद शाळेत प्रवेशीत केले, तर अश्या गावातील या वर्षीचा घर व पाणी कर माफ करण्यात येईल; असा अनोखा व स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी निर्णय स्थानिक ग्रामपंचायतने नुकताच घेतला आहे. यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाकडे विद्याध्थ्यांचा कल वाढणार असून ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचा ग्रामीण पालकांकडून स्वागत होत आहे.