लोकसत्ता टीम

अमरावती : आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने मुलाने वडिलांवर लोखंडी बत्त्याने हल्ला चढवून त्यांची हत्या केली. ही धक्कादायक घटना भातकुली ठाण्याच्या हद्दीतील सायत येथे घडली. या प्रकरणी आरोपी मुलास अटक करण्यात आली आहे.

राजेश श्रीराम मिसाळ (६०) रा. सायत असे मृत वडिलांचे तर अंकुश राजेश मिसाळ (२९) रा. कोकर्डा असे आरोपी मुलाचे नाव आहे. राजेश हे नेहमी पत्नीसोबत वाद घालून तिला मारहाण करीत होते. सोमवारी त्यांनी पत्नीला मारहाण केल्‍याची बाब दर्यापूर तालुक्यातील कोकर्डा येथे आजीकडे राहणारा मुलगा अंकुशला कळली. वडिलांनी आईला मारहाण केल्याचा राग अनावर झाल्याने अंकुशने थेट सायत गाठले. घरी पोहोचताच त्याने वडील राजेश यांना त्याचा जाब विचारला. या कारणावरून दोघांत वाद झाला. या वादात अंकुशने वडील राजेश यांच्या डोक्यावर लोखंडी बत्त्याने हल्ला चढविला. त्यात गंभीर जखमी झालेल्या राजेश यांचा जागीच मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”

याबाबत माहिती मिळताच भातकुली पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा अंकुशविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार प्रवीण वांगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.