scorecardresearch

‘रिफायनरी’बाबत साशंकता; उद्योजक आग्रही तर पर्यावरणवादी विरोधात

चंद्रपुरात रिफायनरी सुरू झाल्यास रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील, असे उद्योजकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे पर्यावरणवाद्यांनी रिफायनरीबाबत विरोधाची भूमिका घेतली आहे

‘रिफायनरी’बाबत साशंकता; उद्योजक आग्रही तर पर्यावरणवादी विरोधात
पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी

पेट्रोल शुद्धीकरण प्रकल्प चंद्रपुरात उभारण्याची घोषणा मी केलेली नाही, हा प्रकल्प येथे होऊ शकतो, अशी केवळ शक्यता मी व्यक्त केली. प्रकल्पाबाबतचा संपूर्ण निर्णय घेणारी केंद्र सरकारची एक स्वतंत्र प्रणाली आहे, अशा शब्दात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पेट्रोल रिफायनरीबाबत घुमजाव केले. रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. मात्र, जिल्ह्यातील उद्योजकांनी हा प्रकल्प येथेच व्हावा, अशी मागणी रेटून धरली आहे तर पर्यावरणवाद्यांनी समाज माध्यमांवर याला विरोध सुरू केला आहे.

हेही वाचा- आश्रम शाळेतील १२० विद्यार्थ्यांना एकाच ट्रकमध्ये कोंबले; श्वास गुदमरल्याने प्रकृती खालावली

पेट्रोलियम मंत्र्यांना निवेदन

पेट्रोलियम मंत्री पुरी यांनी शुक्रवारी एनडी हॉटेल येथे व्यापारी, उद्योजक, वकील, डॉक्टर तथा समाजातील विविध मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी चंद्रपूर एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रूंगठा यांनी चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा, पाणी, तथा विविध खनिज संपत्ती असल्याने पेट्रोल रिफायनरी येथे सुरू करावी, अशी मागणी त्यांना केली. राष्ट्रीय स्वयंम सेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्य व केंद्र सरकारमध्ये या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण नेत्यांचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यात पेट्रोल रिफायनरी आणण्यासाठी या सर्वांनीही प्रयत्न करावे, असेही रूंगठा म्हणाले होते. पेट्रोलियम मंत्र्यांना त्यांनी याबाबतचे निवेदनही दिले. दरम्यान, पेट्रोलियम मंत्र्यांनी रिफायनरी प्रकल्पासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. मात्र, पुरी यांनी चोवीस तासांच्या आत घूमजावही केले. यासंदर्भात आपण निर्णय घेऊ शकणार नाही. तो सरकारचा धोरणात्मक निर्णय आहे. चंद्रपुरात रिफायनरी लावण्याचा कुठलाही विचार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर रिफायनरीबाबतच्या चर्चांना जोर आला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात रिफायनरीला समर्थन आणि विरोधही होत आहे.

हेही वाचा- मुले चोरीच्या अफवेमुळे नाथजोगी व भटक्या समाजात अस्वस्थता; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन

रिफायनरीला उद्योजकांचा पाठिंबा तर पर्यावरणप्रेमींचा विरोध

चंद्रपुरात रिफायनरी सुरू झाल्यास रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होतील, असे उद्योजकांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे पर्यावरणवाद्यांनी रिफायनरीबाबत विरोधाची भूमिका घेतली आहे. रिफायनरीमुळे रोजगार उपलब्ध होणार असला तरी, त्यातून होणाऱ्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर विपरित होतील. त्यामुळे पर्यावरणवाद्यांनी रिफायनरीला विरोध केला आहे. जिल्ह्यात रिफायनरी प्रकल्प उभारण्याबाबत अजून कुठलाही निर्णय झालेला नसला तरी त्याबाबत जिल्ह्यात दोन मतप्रवाह दिसत आहे.

रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील

रिफायनरी झाल्यास विदर्भातील विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. यातून चंद्रपूरच्या विकासाला हातभार लागेल. त्यामुळे या रिफायनरी प्रकल्पासाठी उद्योजकांनी आग्रही भूमिका घेत ही मागणी लावून धरली आहे.

हेही वाचा- परभणी : सेलू तालुक्यातील चार मुले बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

प्रदूषणात भर पडू देणार नाही

उद्योगधंद्यांमुळे चंद्रपूरातील प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. हवेचा निर्देशांक धोकादायक पातळीवर गेला आहे. कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, लोह-पोलाद उद्योग, विज निर्मिती केंद्र, डांबर उद्याेग, बिल्ट पेपर मील यासह इतर छोट्या-मोठ्या उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. एका संस्थेच्या सर्वेक्षणात प्रदूषणामुळे अस्थमा, त्वचा रोग, हदयरोग, रक्तदाब, नाक व डोळ्याचे व इतर त्वचारोगांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून आले. वाढत्या प्रदूषणामुळे आयुर्मानात दहा वर्षांनी घट झाल्याचेही त्यात नमूद आहे. त्यामुळे चंद्रपुरातील उच्चभू वर्ग इरतत्र स्थलांतरित होत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावणवाद्यांनी रिफायनरीला विराेध केला असून प्रदूषणात आणखी भर पडू देणार नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-09-2022 at 14:23 IST

संबंधित बातम्या