लोकसत्ता टीम

वर्धा : हिंदूंच्या प्रश्नावर सर्वत्र रान उठविणारे नेते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांचा परिचय आहे. आजही देशात हिंदू असुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला. वर्ध्यात एका बैठकीसाठी ते आले होते. तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले की, देशात हिंदूंवर सतत अत्याचार होत आहेत. छत्तीसगड राज्यातील कवर्धा येथे एका साधराम नावाच्या हिंदू व्यक्तीचा गळा कापून त्यास ठार मारण्यात आले. एकीकडे भव्य राम मंदिर देशात बांधण्यात आले. पण देशातील ‘साधराम ‘ असुरक्षितच आहेत. विश्व हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दल देशभरात हिंदूंच्या प्रश्नावर आवाज उठविण्याचे काम करीत आहे. उत्तर प्रदेश, छत्तीसगड, गुजरात तसेच देशाच्या अन्य भागात हिंदू लोकांची हत्या केली जात आहे. त्या रोखण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. देशात जिहादीची हिम्मत वाढत आहे. म्हणूनच हिंदूंना अन्यायाचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराला केवळ जिहादी दोषी आहेत. म्हणून हिंदू राष्ट्र निर्मितीची गरज असल्याचे तोगडिया म्हणाले.

आणखी वाचा- नागपुरात गडकरींना पराभूत करणारे काँग्रेस नेते कोण?

ज्याप्रमाणे देशात विकास कामांसाठी जिल्हा विकास यंत्रणा कार्यरत असते त्याच प्रमाणे हिंदूंच्या विकासासाठी आमची हनुमान चालीसा विकास यंत्रणा ‘एचडीओ’ ही यंत्रणा कार्य करीत आहे. ती गाव ते शहर अशा प्रत्येक पातळीवार हिंदूंना समृद्ध करण्याचे काम करते. देशभरात आतापर्यंत बारा हजार हनुमान चालीसा केंद्र स्थापन झाले आहेत. त्यांचे जोमाने काम सुरू आहे. यात सातत्याने वाढ होत आहे, असे तोगडिया म्हणाले. यावेळी संघटनेचे विदर्भ प्रांत कार्याध्यक्ष मोतीलाल चौधरी, विदर्भ प्रांत मंत्री योगेश गायकवाड, राष्ट्रीय बजरंग दलाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष अनुप जायस्वाल प्रामुख्याने उपस्थित होते.