गाभा क्षेत्रात सफारीसाठी उकळले ४० हजार रुपये

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वनपर्यटनासाठी ४० हजार रुपये शुल्क आकारून एकाने चक्क माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांचे पुत्र पंकज गावंडे व अन्य चार मित्रांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची तक्रार क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्याकडे करण्यात आली. यानंतर ताडोबा व्यवस्थापनाने चौकशी सुरू केली आहे.

पंकज गावंडे व त्यांचे मित्र प्रवीण जगन्नाथ कुचर, अभिजीत नंदकिशोर मुळे, प्रवीण अनंतराव सावळे व कुणाल पंजाबराव काळे या पाच मित्रांची अमृत नाईक याने ४० हजार रुपयांनी फसवणूक केली. ते २९ व ३० मे रोजी ताडोबात पर्यटनासाठी आले होते. गाभा क्षेत्रात पर्यटनासाठी त्यांनी अमृत नाईक यांच्याकडून नोंदणी केली होती. यासाठी नाईक यांना ‘गुगल पे’द्वारे २० हजार, १२ हजार व एक हजार आणि रोख सात हजार रुपये, असे एकूण ४० हजार रुपये देण्यात आले. याची पावती नाईक यांनी पर्यटकांना दिली नाही.

हेही वाचा >>> नागपूर : धक्कादायक! चक्क कैदी आणि पोलिसाने केली पार्टी..

४० हजार रुपयांमध्ये कोलारा गेटमधून ताडोबा गाभा क्षेत्रात दोन वनफेरी ठरवण्यात आल्या होत्या. मात्र, नाईक यांनी या पाचही पर्यटकांना कोलारा गेटपासून ४ कि.मी. अंतरावरील निमढेला प्रवेशद्वार येथे आणून सोडले. तेथे चौकशी केली असता हे गाभा क्षेत्र नसून बफर क्षेत्र आहे, असे गावंडे यांना कळले. यानंतर नाईकने दुसऱ्या दिवशीही गाभा क्षेत्राऐवजी बेलारा प्रवेशद्वारातून पुन्हा बफर सफारीच घडवून आणली. दोन्ही ठिकाणी गेट पास किंवा बफर सफारीची पावती देण्यात आली नाही.

हेही वाचा >>> नागपूर ‘एम्स’ला ‘एनएबीएच’ मानांकन, देशात पहिलेच रुग्णालय, पंतप्रधानांकडून अभिनंदन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाईकला याबाबत विचारले असता, ‘आम्हाला ताडोबाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सांभाळावे लागते,’ असे उत्तर त्याने दिले. त्यानंतर उपवनसंरक्षक नंदकुमार काळे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला. तुम्हाला जे काही विचारायचे आहे तुम्ही त्यांनाच विचारा, असे सांगितले. शिवाय, तुम्हाला जे करायचे ते करा, अशी धमकीही दिली. ताडोबातील एजंटकडून झालेल्या फसवणुकीची लेखी तक्रार पंकज गावंडे व मित्रांनी ताडोबाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्याकडे केली आहे. याची दखल घेत डॉ. रामगावकर यांनी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांच्याकडे तक्रार करून उमरेड येथे वास्तव्यास असलेल्या अमृत नाईकविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.