नागपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करणे माजी आमदार आशीष देशमुख यांना महागात पडले आहे. त्यांची काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने देशमुख यांना पक्षविरोधी वर्तनाबद्दल आणि जाहीर वक्तव्याबद्दल पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित  केले आहे.

पक्षाच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत आदेश दिले आहेत. आशीष देशमुख यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधातील वक्तव्य केले होते.  पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या शिस्तपालन समितीने ५ मार्च २०२३ रोजी देशमुख यांना कारणेदाखवा नोटीस बजावली होती. त्याला देशमुख यांनी ९ एप्रिल २०२३ रोजी उत्तर दिले. या उत्तरावर समितीने चर्चा केली आहे. पक्षविरोधी वर्तन आणि जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या घटनेतील शिस्तपालन नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे या प्रकरणात लागू होतात. शिस्तपालन समितीने देशमुख यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांच्या कालावधीसाठी निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे, असे चव्हाण यांनी निर्णय देताना म्हटले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशमुख हे २०१४ मध्ये भाजपकडून काटोलमधून निवडून आले होते. त्यांनी माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांचा पराभव केला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी भाजपला रामराम केला. नंतर त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये फडणवीस यांच्याविरोधात निवडणूकदेखील लढवली. आता ते पुन्हा भाजपशी जवळीक साधून आहेत. फडणवीस यांनी नुकतीच देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट दिली. त्यापूर्वी देशमुख यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. भाजप त्यांना सावनेर विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्याविरोधात मैदानात उतरवण्याची शक्यता आहे.