नागपूर: सोशल मीडियावर फसवणूक करणार्यांनी अनेकांचे बोगस फेसबुक अकाउंट बनवून काही निमित्त सांगून पैसे मागितल्याच्या घटना सध्या वाढत आहेत. अशीच एका घटना राज्यातील भाजपचे आमदार व माजी मंत्री परिणय फुके यांच्यासोबत घडली आहे. त्यांच्या नावे एक बनावट खाते बनवून चक्क नागरिकांना पैशाची मागणी केली जात आहे. या प्रकरणाबाबत आपण जाणून घेऊ या.
डिजिटल इंडियाला सायबर गुन्ह्यांना सामोरे जावं लागत आहे. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. ज्यामध्ये एका सायबर गुन्हेगाराने थेट भाजपचे आमदार आणि माजी मंत्री असलेल्या परिणय फुके फसवलं आहे. या गुन्हेगाराने बोगस फेसबुक अकाऊंट बनवून फसवणूक केली आहे. फुके हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहे. सायबर गुन्हेगाराने फुके यांच्या फेसबुक अकाउंटच्या धर्तीवर बनावट फेसबुक अकाउंट तयार केले. त्यानंतर नागरिकांना सीआरपीएफ जवान संतोष कुमारच्या नावाने पैशाची मागणी केली.
हा प्रकार फुके यांना काही परिचितांनी सांगितला. त्याची गंभीर दखल घेत फुके यांनी स्वतःच्या फेसबुक खात्यात त्याबाबत एक पोस्ट केली. त्यामध्ये त्यांनी महत्वाचा मजकूर लिहून नागरिकांना एक आवाहनही केले आहे.
आमदार परिणय फुके यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये काय ?
माझ्या नावाने खालील प्रमाणे एक फेक फेसबुक अकाउंट तयार करण्यात आले आहे आणि त्या बनावट अकाउंटवरून नागरिकांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे माझे नागरिकांना आवाहन आहे की, अशा फसव्या मेसेजेसना कोणताही प्रतिसाद देऊ नये. कृपया कोणाला अशा प्रकारचा मेसेज आला असल्यास तात्काळ त्या अकाउंटची माहिती ‘रिपोर्ट’ करून ते अकाउंट ‘ब्लॉक’ करावे. सोशल मीडियावर फसवणूक करणाऱ्या अशा प्रवृत्तींपासून सावध राहा आणि कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खातरजमा नक्की करा, धन्यवाद.
नागपूर पोलीस आयुक्तांच्या नावानेही यापूर्वी…
सायबर गुन्हेगारांनी यापूर्वी चक्क नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचेच बनावट फेसबुक अकाऊंट बनवले. त्यांच्या काही मित्रांना संदेश पाठवून पैशांची मागणी केली. यापूर्वी, २०२१ आणि या वर्षी जुलैमध्ये सायबर गुन्हेगारांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमारचे बनावट खाते बनवल्यानंतर असाच प्रकार घडला होता. मात्र, त्या अकाऊंट तयार करणाऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
आयुक्त अमितेश कुमार यांच्या नावाच्या बनावट अकाऊंटवरून सायबर गुन्हेगारांनी पाठवलेला संदेश एका व्यक्तीला मिळाल्यानंतर ही घटना समोर आली. त्या व्यक्तीने पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. सायबर गुन्हेगारांनी आयुक्त कुमार यांच्या अनेक फेसबुक मित्रांनी ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ पाठवल्या होत्या.