नागपूर: पॅरिस येथे आयोजित एअर शोदरम्यान, डसॉल्ट एव्हिएशन आणि रिलायन्स एरोस्पेस लि. यांच्यात फाल्कन २००० जेटसच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक करार झाला असून, फ्रान्सच्या बाहेर अशाप्रकारची प्रथमच ही निर्मिती होणार आहे. ही निर्मिती नागपुरात होणार असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला असून या कराराचे स्वागत केले आहे.

नागपूर, मिहानमध्ये होत असलेल्या या उत्पादनातून भारताच्या हवाई उत्पादन क्षेत्राला मोठा चालना मिळणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया धोरणालाही मोठा बुस्ट मिळेल. आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल. नागपुरात संरक्षण उत्पादनाच्या दृष्टीने अनेक सुविधा निर्मितीचे काम आम्ही केले. त्यादृष्टीने हा एक माईलस्टोन करार आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

भारतासाठी आणि जागतिक बाजारपेठेसाठी फाल्कन २००० ची संपूर्णत: निर्मिती आता नागपुरात होणार आहे. या करारामुळे अमेरिका, फ्रान्स, कॅनडा आणि ब्राझील या देशांच्या पंक्तीत भारत गेला आहे. नागपुरातील डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) हे सेंटर ऑफ एक्सलन्स ठरेल. फाल्कन ८ एक्स आणि ६ एक्स ची असेम्ब्ली सुद्धा तेथेच होईल. यामुळे पहिले मेड इन इंडिया फाल्कन २०२८ पर्यंत नागपुरात तयार होईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१७ मध्ये या डसॉल्ट रिलायन्स एरोस्पेस (डीआरएएल) ची स्थापना करण्यात आली होती. आता नव्या उत्पादन सुविधेमुळे हजारो तंत्रज्ञ आणि अभियंते यांना नागपुरात रोजगार उपलब्ध होणार आहे. डसॉल्ट एव्हिएशन ही संरक्षण दलाला लागणार्‍या राफेलसह, फाल्कनची निर्मिती करणारी जगातील अगग्रण्य कंपनी असून, आतापर्यंत त्यांनी १० हजारावर लष्करी आणि नागरी विमानांची निर्मिती केली आहे. सुमारे ९० देशांना त्याचा पुरवठा केला जातो.