लोकसत्ता टीम

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागलेला नाही. असे असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करुन न्यायालयाचा अवमान केला आहे. तसेच हा आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याने निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. २८ मार्च २०२४ रोजी खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशावेळी बावनकुळे यांनी, सर्वोच्च न्यायालयाने नवनीन राणा प्रकरणी निर्णय दिलेला आहे, अशा प्रकारचा चुकीचा व दिशाभूल करणारा खोटा दावा केला आहे. अशा पद्धतीचे विधान जाणीवपूर्वक करुन खोटी माहिती पसरवली जात आहे, हा प्रकार मतदारांवर प्रभाव टाकणारा आहे, तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

आणखी वाचा-वर्धा : शरद पवार काँग्रसचे माजी आमदार अमर काळेंना म्हणाले, ‘थोडे थांबा….’

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाल्या, अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मुंबई उच्च न्यायालयाने २०२१ मध्ये रद्द ठरवत दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. २८ फेब्रुवारी २०२४ च्या सुनावणीनंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवलेला आहे, असे असतानाही बावनकुळे यांनी निकाल लागलेला आहे, असे खोटे सांगून जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.