चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या मोहर्ली वनपरिक्षेत्रातील सीतारामपेठ बिट परिसरात शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. हल्ल्यात शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत शेतकऱ्याचे नाव अमोल बबन नन्नावरे (३८) आहे. ही घटना बुधवारी (२४ सप्टेंबर) सकाळी ११.३० वाजता उघड झाली.

भद्रावती तालुक्यातील मोहर्ली येथून जवळच असलेल्या भामडेळी येथील गट क्रमांक-०४ मधील शेतामध्ये काम करीत असतांना अंदाजे सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान वाघाने ठार केले. या घटनेची माहिती प्राप्त होताच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, व पोलिस निरीक्षक योगेश पारधी तसेच वनपाल व क्षेत्रीय वनरक्षक यांचे सोबत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे पाठविण्यात आला. मृताची पत्नी प्रेमिला अमोल नन्नावरे यांना तात्काळ मदत म्हणून ५० हजार रुपये देण्यात आले.

या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून गावकऱ्यांना शेतामध्ये काम करीत असतांना सतर्क राहून कामे करणेबाबत जन-जागृती करण्यात येत आहे. घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली हे करीत आहेत.