अमरावती : अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचे नुकसान होऊनही पंचनामे न झाल्याच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात एका शेतकऱ्याने आपल्या सहा एकर शेतातील उभ्या सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरवून शासनाचा निषेध नोंदवला. या घटनेमुळे पंचनामे आणि नुकसानभरपाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे या शेतकऱ्याने निमंत्रण पत्रिका छापून रोटाव्हेटर फिरवला.
ही घटना शेंदोळा बुद्रुक येथील शेतकरी दयाराम राठोड यांच्या बाबतीत घडली. राठोड यांनी आपल्या सुजातपूर येथील शेतात लागवड केलेल्या सोयाबीन पिकाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. वारंवार तक्रारी करून आणि महसूल विभागाला विनंती करूनही पंचनामे झाले नाहीत, असा आरोप त्यांनी केला. यावर संतापून त्यांनी थेट आपल्या शेतात रोटाव्हेटर चालवण्याचा निर्णय घेतला.
राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिवसा तालुक्यात यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सर्वच महसूल मंडळांमध्ये पिकांची स्थिती वाईट असतानाही पंचनामे वेळेवर झाले नाहीत. राठोड यांनी आपल्या शेताचा पंचनामा करण्यासाठी अनेक वेळा महसूल विभागाकडे तक्रार केली, मात्र दखल घेतली गेली नाही, असा त्यांचा दावा आहे. याच निषेधार्थ त्यांनी महसूल विभागाला निमंत्रण देऊन रोटाव्हेटर चालवण्याचा कार्यक्रम आखला होता.
अशी आहे निमंत्रण पत्रिका
‘आपणांस आमंत्रित करण्यास अत्यंत आनंद होत आहे की, सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर व रोटाव्हेटर फिरवण्याचा कार्यक्रम ठरविला आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, अल्पोपहाराची व्यवस्था केलेली आहे, स्थळ आमचे शेत, शेंदोळा बु. मैजे सुजातपूर ता. तिवसा जि. अमरावती.’ अशी ही निमंत्रण पत्रिका राठोड यांनी छापली होती. ही निमंत्रण पत्रिका चर्चेला विषय ठरली होती. त्यांनी सहा एकरातील सोयाबीनवर रोटाव्हेटर फिरवला आणि त्यानंतर शेतात चाळीस मेंढरे सोडून आपला संताप व्यक्त केला.
प्रशासनाने केला दावा
दुसरीकडे, तिवसा महसूल विभागाने प्रसिद्धीपत्रक जारी करून वेगळा दावा केला आहे. त्यांच्या मते, राठोड यांच्या शेताचे नुकसानाचे पंचनामे गेल्या महिन्यातच झाले आहेत. यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करण्यात आला असून, यावेळी राठोड यांचे बंधूही उपस्थित होते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
शेतकऱ्याचे म्हणणे काय?
यावर दयाराम राठोड म्हणाले, सुजातपूर आणि शेंदोळा येथील संपूर्ण सोयाबीन पीक नष्ट झाले आहे. मी स्वतः आणि गावातील इतर शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे वारंवार निवेदने दिली, परंतु कोणताही अधिकारी बांधावर फिरकला नाही. शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेल्या या शासन व्यवस्थेचा निषेध म्हणून मी आज शेतातील पिकावर रोटाव्हेटर फिरवला.
