बुलढाणा : अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानीचा मोबदला न मिळाल्याने एका शेतकऱ्याने भारतीय जनता पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री संजय कुटे यांचे निवासस्थान पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. याबाबतची तक्रार जळगाव जामोद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. यामुळे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चेला पेव फुटले आहे.

प्राप्त माहितीनुसार, काल शुक्रवारी मध्यरात्री आमदार संजय कुटे हे त्यांच्या जळगाव जामोद येथील निवासस्थानी हजर होते. यावेळी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुख याने संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात प्रवेश केला. त्याच्या हातात पेट्रोलची कॅन  होती. हाती कॅन घेऊन त्याने मला अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा मोबदला अद्याप न मिळाल्याने मी आमदारांचा बंगला जाळून टाकतो, असे आमदार कुटे यांच्या सहकारी मंडळींना सांगितले. पेट्रोलची कॅन घेऊन तो बंगल्याच्या प्रवेशद्वारकडे जात असताना कुटे यांच्या स्वीयसहायकाने त्याला वेळीच ताब्यात घेतले. त्याला पकडून जळगाव जामोद पोलिसांच्या स्वाधीन केले.

याप्रकरणी पोलिसांनी शेतकरी विशाल मुरुख यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३३ , ३५१(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील चौकशी जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात येत आहेत.

नुकसानभरपाईपासून वंचित

मागील २०२२ मध्ये जळगांव जामोद मतदारसंघात ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली होती. यात हजारो नागरिक आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने पीडितांसाठी मोठ्या प्रमाणात मोबदला मंजूर केला. अनेक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वितरणदेखील करण्यात आले होते. या अनुदानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. मात्र अनेक अतिवृष्टी पीडित या अनुदानापासून वंचित राहिले होते. हे विशेष.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘केवायसी’ झाल्यानंतरही पैसे मिळाले नाही

आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थान परिसरात शिरल्यानंतर आरोपी विशाल मुरुख जोरजोरात ओरडू लागला. ‘अतीवृष्टीचे पैसे आतापर्यंत मिळाले नाही. ‘केवायसी’ केल्यानंतरसुद्धा तहसील कार्यालय, संग्रामपूरकडून अनुदान खात्यात जमा करण्यात आले नाही,’ असा आरोप तो करीत होता. ‘मी आमदार संजय कुटे यांचे निवासस्थान जाळून टाकतो,’ अशी धमकी त्याने दिली.