अमरावती : अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतीचे झालेले १०० टक्के नुकसान, त्यातच शासनाने दिलेले तुटपुंजे १७५० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले आहे. ही मदत अपमानास्पद असल्याचे सांगून या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने चांदूरबाजारमध्ये ‘ताटवाटी आंदोलन’ केले. कार्यकर्त्यांनी यावेळी शासनाला धारेवर धरले. संतापलेल्या शेतकरी आणि महिला कार्यकर्त्यांनी हे अनुदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना परत पाठवून आपला तीव्र संताप व्यक्त केला.
प्रहार तालुका अध्यक्ष प्रदीप बंड आणि दिनेश आमझरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी, धुके आणि महापूरामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे नष्ट झाले. एक एकर शेतीसाठी ५० हजार रुपयांहून अधिक खर्च करूनही हातात आलेल्या केवळ १७५० रुपयांच्या मदतीला शेतकऱ्यांनी ‘आयुष्याशी केलेला टवाळखोरपणा’ असे संबोधले.
शासनावर तीव्र टीका, पंजाब पॅटर्नचा दाखला
आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध तीव्र घोषणाबाजी करत आपला आक्रोश व्यक्त केला. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शासनाच्या धोरणावर कठोर शब्दांत टीका केली. शेतकरी आज भूक, कर्ज आणि नैराश्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. असे असतानाही हिंदुत्वाचा गाजावाजा करणारे सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पाहायला तयार नाही. जर अशा अपमानजनक मदतीचे तुकडे फेकले जात राहिले, तर उद्रेक अटळ आहे आणि त्याला हे बधीर सरकारच जबाबदार असेल, असा इशारा प्रहारने दिला.
शासनाने दिलेले तुटपुंजे १७५० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे ठरले आहे. ही मदत अपमानास्पद असल्याचे सांगून या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाने चांदूरबाजारमध्ये ‘ताटवाटी आंदोलन’ केले.https://t.co/2jrmCKw8Ui#Viralvideo #farmer #govt @Dev_Fadnavis pic.twitter.com/70Pou9yxKo
— LoksattaLive (@LoksattaLive) October 1, 2025
यावेळी शेतकऱ्यांनी पंजाब राज्यातील पॅटर्नची आठवण करून दिली. पंजाब सरकारने ओल्या दुष्काळात प्रति हेक्टर ५० हजार रुपयांची मदत तत्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही भरीव मदत त्वरित जाहीर करावी. अन्यथा, शेतकऱ्यांचा हा आक्रोश रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असे आंदोलकांनी सांगितले.
या आंदोलनात गजानन खुळे, माधवराव धोंडे, अनिल खैरकार यांच्यासह शेकडो शेतकऱ्यांनी मिळालेले अनुदान परत केले. तसेच, वर्षा ढाले, स्वाती बलंगे, गीतांजली नाकडे, स्टेला यांसारख्या महिला कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी शासनाविरोधात आवाज बुलंद केला. गेल्या अनेक दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लढा उभारला आहे. ते राज्यात ठिकठिकाणी सभा घेत आहेत. नागपूरमध्ये होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन ते शेतकऱ्यांना करीत आहेत. त्यातच चांदूर बाजारमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.