नागपूरः पाचवीत प्रवेश देण्यासाठी नऊ हजार रुपयांची लाच घेताना महात्मा गांधी इंग्लिश शाळेतील (विनाअनुदानित) मुख्याध्यापिका व पर्यवेक्षिकेला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने (एसीबी) शनिवारी अटक केली.

डायना अलेक्झांडर अब्राहम (३६) रा. मार्टिन नगर (मुख्याध्यापिका) आणि रेखा हर्षवर्धन मोहिते (६२) रा. गायत्री नगर, झिंगाबाई टाकळी (पर्यवेक्षिका) अशी आरोपींची नावे आहेत. एसीबीच्या माहितीनुसार, आरोपींनी पाचपावली येथील एका ३८ वर्षीय महिलेला तिच्या मुलांच्या १०० टक्के अनुदानित शाळेत प्रवेशासाठी लाचेची मागणी केली. अनुदानित शाळेत प्रवेश मिळाल्यावर पुढे शुल्क लागणार नसल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा – असेल परवानगी बांधकामाची, गरज नसेल एन.ए.ची, काय आहे योजना?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलेला लाच द्यायची नसल्याने तिने एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार सापळा रचण्यात आला. ठरल्यानुसार महिला जरीपटकातील महात्मा गांधी इंग्लिश स्कूल, येथे पोहोचली. येथे तिने लाचेचे ९ हजार रुपये विनाअनुदानित शाळेत मुख्याध्यापिका असलेल्या डायना अलेक्झांडर यांच्या हातात दिले. त्यानंतर दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले. ही माहिती कळताच तेथे खळबळ उडाली. या शाळेत अनुदानित आणि विनाअनुदानित अशा दोन वेगवेगळ्या तुकड्या आहेत. अनुदानित वर्गात विद्यार्थ्यांना शुल्क लागत नाही. तर विनाअनुदानित वर्गात शुल्क लागते. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, पोलीस उपनिरीक्षक महेश चाटे, पोलीस उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्वात शिवशंकर खेडेकर, नितीन बलिगवार, राम शास्त्रकर, करुणा सहारे, कांचन गुलबसे, अस्मिता मल्लेरवार यांनी केली.