चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावर कापनगाव येथे २८ ऑगस्टला ‘हायवा’ ट्रकने ऑटोरिक्षाला दिलेल्या धडकेत सहा निष्पाप प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजुरा पोलिसांनी आरोपपत्रामध्ये अपघाताला कारणीभूत असलेल्या ट्रकचा क्रमांक चुकीचा नोंदवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे भविष्यात कायदेशीर अडचणी आणि विम्याची रक्कम मिळवताना अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. हा प्रकार अनावधानाने झाला की मुद्दामहून करण्यात आला, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

या अपघातात वर्षा बंडू मांदळे ( ४१, खामोना), तनु सुभाष पिंपळकर (१८, पाचगाव), ताराबाई नानाजी पापुलवार (६०, पाचगाव), प्रकाश मेश्राम (५०, ऑटोचालक, पाचगाव), रवींद्र हरी बोबडे (४८, पाचगाव) आणि शंकर कारू पिपरे (५०, कोची) या सहा जणांचा मृत्यु झाला होता तर दोन जण गंभीर जखमी झाले होते. या अपघात प्रकरणी राजुरा पोलीसांनी गुन्हा नोंद केला होता. अपघातानंतर राजुरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एफआयआर नोंदवला.

मात्र, एफआयआरमध्ये हायवाचा क्रमांक (आरजे – १४-जीयू-९२२१) असा चुकीचा नोंदवला गेला, तर प्रत्यक्षात वाहनाचा क्रमांक (आरजे-जीक्यू-९२२१) आहे. एवढ्या गंभीर प्रकरणात पोलिसांनी अशी चूक कशी केली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. एफआयआर नोंदवण्यापूर्वी वाहन क्रमांकाची पडताळणी करणे आवश्यक असते. मात्र, राजुरा पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. आरोपीला पोलिसांनी अटक केली असली, तरी चुकीच्या क्रमांकामुळे कायदेशी अडचणी येण्याची शक्यता आहे. चुकीच्या क्रमांकामुळे तपासात गोंधळ होऊ शकतो, पुरावे कमकुवत होऊ शकतात आणि न्यायालयात खटला कमजोर होण्याची शक्यता आहे.

यामुळे दोषी व्यक्ती निर्दोष सुटण्याचा धोका वाढतो. तसेच, विमा दावे आणि नुकसान भरपाईच्या प्रक्रियेतही अडथळे येऊ शकतात. चुकीचा वाहन क्रमांक नोंदवल्याने प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि पुराव्यांचा मेळ बसणार नाही, ज्यामुळे तपासात गोंधळ होईल. चुकीचा वाहन क्रमांकामुळे विम्याचा दावा करतांनाही अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता आहेत. दरम्यान अपघातग्रस्त ट्रक हा राजस्थान येथील आहे. दरम्यन यासंदर्भात राजुराचे ठाणेदार सुनील परतेकी यांना विचारणा केली असता सुरूवातीला हायवाचा गाडी क्रमांक चुकीचा नोंदविला गेला, मात्र त्यानंतर आम्ही त्यात दुरूस्ती केली अशी माहिती दिली. परंतु प्रस्तुत प्रतिनिधीला प्राप्त एफआयआरमध्ये अजूनही चुकीचाच वाहन क्रमांक असल्याचे दिसून येत आहे.