भंडारा : बागेश्वर धाम बाबा त्यांच्या आक्षेपार्ह विधानामुळे ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. मानव धर्माचें संस्थापक जूमदेव ठूब्रिकर यांच्या विरुध्द केलेले वादग्रस्त विधान धीरेंद्र शास्त्री अर्थात बागेश्वर बाबा यांना चांगलेच भोवले असून अखेर त्यांच्या विरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरजलाल अंबुले यांच्या तक्रारीवरून धीरेंद्र शास्त्रींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्याची देखील मागणी करण्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी शहरात धीरेंद्र शास्त्री म्हणजे बागेश्वर बाबा यांचा दिव्य दरबार २७ मार्चपासून २ एप्रिलपर्यंत चंदू बाबा स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी मानवधर्माचे संस्थापक जूमदेव ठूब्रिकर यांच्याविरुध्द आक्षेपार्ह विधान करत टीका केली. त्यामुळे लाखो अनुयायांची मनं दुखावल्या प्रकरणी भंडारा गोंदिया जिल्हयातील आणि विविध पोलीस ठाण्यांत धीरेंद्र शास्त्रींविरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हेही वाचा… लोकसभा निवडणूक : ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले तर काय? ‘ही’ असेल उपाययोजना

मात्र आतापर्यंत फक्त मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अजूनही कुठली कारवाही झाली नसल्याने हजारोच्या संख्येनं अनुयायांनी भंडारा तुमसर मार्ग बंद करत पोलीस ठाण्यासमोरचा मार्गही बंद केला.

सत्संग मध्ये मानव धर्माचें संस्थापक जूमदेव ठूब्रिकर आणि त्यांच्या एका सेवकाबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्यामुळे तेथील बाबा जुमदेव महाराज यांचे भक्त संतापले आहेत. बाबा जमुदेव महाराजांना मानणाऱ्या भाविकांनी बागेश्वर बाबांच्या विरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे. तसेच बागेश्वर बाबाला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी देखील भक्तांकडून केली जात आहे. बागेश्र्वर धाम बाबा यांच्या वक्तव्याने लाखो सेवकांचे मन दुखावल्याने भंडारा ,गोंदिया, नागपूर जिल्हयातील विविध पोलिस स्टेशन येथे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरूद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. काल नागपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि सेवकांनी मोहाडी पोलीस स्टेशन गाठले. त्यामुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. अखेर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी आयोजक व धिरेंद्र शास्त्री यांच्या विरुध्द कलम २९५ कलम अन्तर्गत गुन्हा दाखल केला.

नेहमी वादग्रस्त विधान करून प्रसिद्धीच्या झोतात राहणारे बागेश्वर बाबा यांनी मोहाडीत बाबा जुमदेवजी आणि त्यांच्या सेवकांच्या विरोधात हनुमानजींच्या पुजेवरून भावना दुखावणारे वादग्रस्त विधान केले. यावेळी ते म्हणाले की, नागपूर आणि भंडारा या क्षेत्रामध्ये एका विशेष संप्रदायाला मानणारा वर्ग आहे. ते हनुमानजींना तर मानतात. मात्र, हनुमानजींची पूजा करणे मानत नाही. श्राद्ध करायचे नाही, माता पित्यांचे फोटो ठेवायचे नाहीत, राम राम बोलायचे नाही, जय गुरुदेव बोला…. जो हनुमान संपूर्ण जीवनभर राम राम बोलला, त्यांचे उपासक राम राम नाही बोलणार. हद्द झाली यार…. रसगुल्ला खात आहेत…. मात्र शुगर असल्याचे सांगत आहेत. असे करणाऱ्या लोकांनी कान उघडून ऐकावे की, तुमचे पूर्वज नरकात गेले आहेत. तुमची येणारी पिढी पण नरकात जाईल. अशी भक्ती हनुमानजींना कधीच प्रिय नाही, असे वक्तव्य बागेश्वर बाबांनी भागवत सप्ताहात केले.

हेही वाचा… वंचितची दुसरी यादी जाहीर; उमेदवारांच्या जातीचाही उल्लेख

काल स्वतःच्या वक्तव्यावरून अडचणीत आल्याचे लक्षात येताच बागेश्वर बाबा यांनी पलटी खात मी कोणत्याही संतांच्या किंवा चांगले काम करणाऱ्यांच्या विरोधात नाही तसेच माझ्या प्रवचनात मी बाबा जुमदेव यांच्याबद्दल चुकीचे काहीही बोललो नाही असे ते म्हणाले. बाबा जूमदेव यांनी राज्यात नशामुक्तीसाठी अभियान राबविले, अंधश्रद्धा निर्मूलनसाठी बुलंद आवाज उठवला आणि सनातन धर्माच्या उत्थाणासाठी हनुमानाची उपासना केली ते बाबा जूमदेव महान त्यागी होते, त्यामुळे मी त्यांच्या विरोधात बोलू शकत नाही अशी स्पष्टोक्ती काल त्यांनी दिली. त्याच प्रमाणे, मी काल जुमदेव बाबांचे मानसपुत्र रमेशबाबु यांच्याशी बोललो असून त्यांनी सांगितले की, यात काही लोक राजकारण करीत आहेत , बाबा जुमदेव यांनी कधीही आई वडीलांची पूजा करण्याचा विरोध केला नसल्याचे त्यांनी सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या हजारो भक्तांनी त्यांच्या अटकेची मागणी लावून धरली आहे. या प्रकरणात आज काय कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.