बुलढाणा : शेगाव मधील एका विद्यार्थ्याची उष्माघाताने गेल्याची जोरदार चर्चा शेगावात होत आहे. संस्कार सोनटक्के असे या विध्यार्थ्याचे नाव असून ११ वर्षीय विद्यार्थी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ मध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत होता. यामुळे आरोग्य यंत्रणेसह जिल्हा प्रशासन देखील हादरले आहे. संस्कार सोनटक्के या विद्यार्थ्याला उन्हाचा फटका बसला. त्यात त्याची तब्येत गंभीर झाली असता उपचारासाठी त्याला अकोला येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात उष्मघाताचा पहिला बळी गेला आहे बुलढाणा जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून त्याचा थेट फटका हा शाळकरी विद्यार्थ्यांना बसत आहे. शेगाव मधील तापमान एप्रिल महिन्यात चाळीस अंशांच्यावर असते. कोवळ्या वयाच्या संस्कारला या प्रखर उन्हाचा फटका बसल्याचे समजते.

प्रशासन म्हणते…

यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष कडे कुठलीही माहिती नसल्याचे दिसून आले. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे देखील माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती जिल्हा आरोग्य विभाग आणि आरोग्य यंत्रणाकडून घेण्यात येत असल्याचे जिल्हा आपत्ती कक्षाच्या वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.दरम्यान, खामगाव व शेगाव शहरातील वरिष्ठ महसूल विभाग सूत्रांनी या घटनेचा अप्रत्यक्ष पणे दुजोरा  दिला.  या सूत्रांनी सांगितले की, संस्कार सोनटक्के  हा संत गजानन महाराज ज्ञानपीठमधून दोन दिवसांपूर्वी घरी आला. त्यावेळी संस्कार सोनटक्के याला ओकारी झाली. यामुळे संस्कार याला शेगाव येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले.

तेथील उपचार नंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे संस्कार सोनटक्के याला शेगाव शहरातीलच मोठ्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तरीही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अकोला येथील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाने मात्र संस्कार सोनटक्के याचा मृत्यू मेंदूज्वर मुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. त्याला प्रारंभी ‘ व्हायरल इन्फेकशन ‘ झाले होते, नंतर ताप मेंदूत गेल्याने संस्कारचा मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली.