नागपूर: यंदा राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ दर्जा दिल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळख अधिक गडद होणार आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात पुण्यात झाली ही गोष्ट सर्वांना माहीत आहे. पण ही सुरुवात कुणी केली, याबाबत एक वाद दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव नेमका कुणी सुरू केला याचाच घेतलेला हा आढावा.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला ही बाब कुणी नाकारणार नाही. पण टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली होती, असा भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचा दावा आहे.
“लोकमान्य टिळकांनी १८९४ साली विंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाची सुरुवात केली तर भाऊसाहेब रंगारी यांनी दोन वर्षं आधी म्हणजेच १८९२ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती,” असं रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सांगतात.
तर पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात १८९३ साली झाल्याचं मत इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी दिलं आहे. “भाऊसाहेब रंगारी, विश्वनाथ खासगीवाले आणि गणेश घोटावडेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. या तिघांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची नोंद टिळकांनी १८९३ मध्ये एक स्फूट लेख लिहून केसरीतून घेतली होती. त्याच्या दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवाची संख्या तीनहून वाढून शंभरच्या वर गेली होती.”
कसा होता रंगारींचा गणपती?
भाऊसाहेब रंगारी यांनी १८९२ मध्ये गणेश मूर्तीची स्थापना केली. ही मूर्ती राक्षसावर प्रहार करून त्याचा नायनाट करणारी होती. लाकूड व भुशाचा वापर करून ती तयार करण्यात आली होती. ही मूर्ती अद्यापही बदलण्यात आली नाही, असा दावा केला जातो.
टिळकांनी कधी केली सुरूवात?
लोकमान्य टिळकांनी १८९४ मध्ये पुण्यातील विंचूरकर वाड्यात गणेशाची स्थापना केली. त्यावर्षी पुण्यात शंभरहून अधिक सार्वजनिक गणपतींची स्थापना करण्यात आली होती. टिळकांच्या केसरी वृत्तपत्रातही याचा उल्लेख करण्यात आला होता. गणेशोत्सव आणि शिवजयंती या प्रसंगाचं औचित्य साधून टिळकांनी युवकांमध्ये राष्ट्रतेज जागृत केलं, असं इतिहासकार बिपान चंद्रा यांचं मत आहे. बिपान चंद्रा यांनी आपल्या ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ या पुस्तकात म्हटलं आहे, “१८९४ सालापासून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी केला. देशभक्तीपर गीतं आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत असत. १८९६ मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला देखील सुरुवात केली. त्याच वर्षी टिळकांनी विदेशी कपड्यांवरील बहिष्काराची चळवळ देखील सुरू केली होती.”