नागपूर : जर रस्त्यावर आपल्या गाडीचे इंधन संपले तर आपण नजीकच्या पेट्रोलपंपावर जाऊन इंधन भरू शकतो किंवा तसे शक्य नसेल तर निदान गाडी ज्या ठिकाणी आहे तिथेच ठेवून इंधनाची व्यवस्था करण्यासाठी जाऊ शकतो. मात्र समजा जर हीच परिस्थिती विमान प्रवासात उद्भवली तर काय होईल? उंच आकाशात उडणाऱ्या विमानातील इंधन ज्या ठिकाणी जायचे आहे. त्यापूर्वीच संपले तर तो अनुभव प्रवाशांसाठी जीवघेणाच ठरेल. एखाद्या चित्रपट किंवा वेब सिरीजमधील वाटणारी ही कथा खऱ्या आयुष्यात घडली आहे. नागपूरवरून शारजाह जाणाऱ्या विमानाची ही कथा थक्क करणारी आहे.

नेमके काय घडले?

एअर अरेबियाचे नागपूर-शारजाह विमान प्रवासात ३ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. या घटनेने प्रवाशांमध्ये काही काळ संभ्रम पसरला होता. ३ ऑक्टोबरच्या पहाटे घडलेल्या या प्रसंगानंतर प्रवासी अक्षरशः थक्क झाले. विमान सुरक्षितरीत्या उतरल्यानंतर काही प्रवासी सीट बेल्ट सोडून दरवाज्याकडे जायला निघाले, तेव्हा केबिन क्रूने त्यांना वास्तव सांगितले. हे ऐकून प्रवाशांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि सुटकेचे भाव एकाच वेळी उमटले. एअर अरेबियाच्या क्रमांक जी-४१६ या विमानाने नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहाटे ५:१५ वाजता उड्डाण केले. एअरबस ए-३२० या विमानात सर्व सीट भरलेल्या होत्या. या विमानाला नागपूर ते शारजाह असा एकूण १३२१ नॉटिकल माइल प्रवास करायचा होता. मात्र, इंधन संपल्याने विमानाला रास-अल-खैमापर्यतच्या १२७० नॉटिकल माइल अंतरावर उतरवावे लागले. 

विमान हवेत असताना इंधनाचा दबाव झपाट्याने कमी होत असल्याचे वैमानिकांना जाणवले. त्यांनी तत्काळ एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून जवळच्या सुरक्षित विमानतळावर लैंडिंगची परवानगी मागितली. काही मिनिटांतच रास-अल-खैमामध्ये सुरक्षित लैंडिंग करण्यात आले. इंधन भरण्यासाठी काहीच मिनिटे लागली. मात्र, शारजाहसारख्या व्यस्त विमानतळावर लँडिंगसाठी स्लॉट मिळायला जवळपास एक तास गेला. सुमारे दीड तास थांबल्यानंतर विमान शारजाहला पोहोचले. या विमानात नागपूरहून यूएईमधील नातेवाइ‌कांना भेटायला जाणारे अनेक प्रवासी होते. रास-अल-खैमामध्ये उतरल्याचे समजल्यावर काही काळ संभ्रम निर्माण झाला; पण विमान सुरक्षित असल्याचे पाहून सर्वांनी वैमानिक आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. युनायटेड अरब अमिरात (यूएई) हा देश जगातील सर्वात मोठ्या एव्हिएशन इंधन उत्पादकांपैकी एक आहे. त्याच देशातील विमानसेवेची ही धक्कादायक आश्चर्यजनक घटना आहे.