नागपूर : देशाअंतर्गंत हवाई सेवेचा विस्तार होऊन पर्यटन आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळावी म्हणून उड्डाण योजनेअंतर्गंत लहान शहरातील विमानतळ विकास आणि हवाई सेवा सुरू करण्याचे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारले. परंतु या योजनेचा बोजवारा उडाला असून नागपूर सारख्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चार शहरातील विमान सेवा बंद करण्यात आली आहे.

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथून नाशिक, औरंगबाद आणि लखनौ शहरासाठीची थेट हवाई सेवा बंद करण्यात आली आहे. त्यासाठी उन्हाळी वेळापत्रकाचे कारण देण्यात आले होते. परंतु हे वेळापत्रक जुलै महिन्यात संपुष्टात आले आणि नवीन वेळापत्रका लागू झाले. तरी देखील या तीन शहरासाठी हवाई सेवा पूर्ववत करण्यात आलेली नाही. स्टार एअर सर्व्हिसने दोन महिन्यांपूर्वी (मे महिना) सुरू केलेली नागपूर ते कोल्हापूर विमान सेवा आता बंद करण्यात आली आहे. ही सेवा ऑगस्ट महिना अखेर पर्यंत बंद राहणार आहे. ही सेवा नागपूरहून आठवड्यातून तीन दिवस (सोमवार, शुक्रवार आणि रविवार) दुपारी २.३५ वाजता आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने नागपूरशी कोल्हापूरला (महालक्ष्मी मंदिर) जोडण्यात आले. भाविकांचा प्रतिसाद मिळू लागतचा विमान सेवा बंद करण्यात आली आहे.

प्रादेशिक संपर्क व्यवस्था योजना (आरसीएस) – उड्डाण (उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गंत देशातील पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था सुधारणे, विशेषत: दुर्गम आणि सेवा नसलेल्या प्रदेशांमध्ये ती सुधारणे हा उद्देश आहे. नागरी विमान वाहतुक मंत्रालयाने २१ ऑक्टोबर २०१६ रोजी सुरूवात केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ एप्रिल २०१७ रोजी शिमला ते दिल्ली दरम्यान पहिल्या आरसीएस-उडान उड्डाणाचा प्रारंभ केला.

या योजनेअंतर्गत विमानकंपन्यांना अनेक सवलती दिल्या जातात. केंद्र सरकारकडून विमान भाड्यात अनुदान दिले जाते. तिकिटांवरील सेवा करात सवलत दिली जाते. उडान-आरसीएस उड्डाणांना इतर विमानकंपन्यांशी वाहतूक करार करण्याची परवानगी आहे. राज्यातील सरकार तेथील उडान-आरसीएस विमानतळांवर विमानकंपन्यांना कर सवलत दिली जाते. विमानतळाच्या विकासासाठी मोफत जमीन दिले जाते. कमी दराने पाणी, वीज आणि इतर उपयुक्तता सुविधांची उपलब्ध केल्या जातात. उडान योजनेअंतर्गत असलेल्या तिकिटांना अनुदान देण्यासाठी प्रमुख शहरांना जोडणाऱ्या उड्डाणांवर उपकर आकारून आरसीएस अनुदानाचे पैसे उभे केले जातात.