नागपूर : विदर्भात मुसळधार पावसाचा जोर कायम असून चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ जिल्ह्यांतील पूरस्थिती कायम आहे. गेल्या १० दिवसांत पुरामुळे किमान १६ जण दगावले असून घरे व शेतीचीही मोठय़ा प्रमाणात हानी झाली आहे. चंद्रपूरला पुराचा वेढा पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे चंद्रपूर शहरालगतची इरई नदी ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे. शहरातील सखल आणि नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. चंद्रपूर शहरातल्या रहमतनगर, सिस्टर कॉलनी, तिमांडे लेआऊटमधल्या हजारो घरांना पुराच्या पाण्याचा विळखा पडला आहे. पाणी वाढण्याच्या भीतीने अनेक लोकांनी स्थानांतरण करणे सुरू केले आहे.

रामसेतू पूल सहा इंच खाली आला आहे. अनेक वस्त्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात पुराचा फटका बसला आहे. पैनगंगा, वर्धा, झरपट नद्यांना पूर आला आहे. जिल्ह्यात पाऊस थांबला असला तरी यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांतील अतिवृष्टीमुळे चंद्रपुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. वनसडी-अंतरगाव, भोयगाव-धानोरा मार्ग बंद झाले आहेत. परसोडा, रायपूर, अकोला, पारडी, कोडशी, जेवरा, पिपरी, वनोजा, सांगोडा, अंतरगाव इरई, कारवा, भोयगाव भारोसा आदी गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अंतरगाव येथे घरांमध्ये पुराचे पाणी शिरले.

बुलढाणा, यवतमाळमध्ये जनजीवन विस्कळीत

यवतमाळ जिल्ह्यात शनिवारी पुराने हाहाकार माजवला होता. रविवारी मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा दौरा केला. जिल्ह्यात १ हजार ४२६ घरांची पडझड झाली असून २८० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात ४ हजार ३८५ घरांची पडझड झाली. तेथील हजारो हेक्टर जमीन पुरामुळे खरडून गेली आहे.

अमरावतीत युवक बुडाला

अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ब्राम्हणवाडा थडी येथे एक युवक नदीच्या पुरात वाहून गेल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मोहम्मद शोएब मोहम्मद असलम (२२) असे त्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांत ब्राम्हणवाडा येथील नदीला पूर आला आहे.