कारवाई पथक परतताच खाद्यविक्री सुरू

नागपूर : माटे चौक ते आयटी पार्क मार्गावरील खाद्यपदार्थाच्या दुकानांवर कारवाईचे सत्र सुरू आहे. परंतु, या कारवाईला न घाबरता येथे  खाद्यविक्री सुरूच आहे. मंगळवारी दुकाने उघडलेली बघून सोनेगाव वाहतूक पोलिसांनी पुन्हा कारवाई केली. परंतु, पोलीस पथक परतताच दुकाने पूर्ववत सुरू झाली. आधीच वादळामुळे झाडे पडलेली, त्यात पुन्हा या मार्गावर खवय्यांची अस्ताव्यस्त वाहने उभी राहिल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली. हे खाद्यविकेते पोलिसांनाही जुमानत नसल्याने आता कुणाकडे दाद मागावी, असा सवाल या परिसरातील नागरिकांनी ‘लोकसत्ता’कडे उपस्थित केला.

तीन ते चार वर्षांपासून माटे चौक ते आयटी पार्क चौकापर्यंतच्या रस्त्यावर खाद्यपदार्थाचे जवळपास शंभराहून जास्त दुकाने लागतात. अनेकांनी अनधिकृतरित्या वाहनांमध्ये बदल करून त्यावर हॉटेल थाटले आहे. या सर्व गाडय़ा रस्त्यावरच लावण्यात येत असल्यामुळे  ग्राहक रस्त्यावरच  वाहने उभी करीत होते. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत होती. वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत ‘लोकसत्ताने’ वृत्तमालिका प्रकाशित केली. त्यामुळे महापालिकेचा अतिक्रमण विभाग आणि वाहतूक पोलीस झोपेतून जागे झाले. त्यांनी संयुक्तपणे कारवाई केली. तसेच अनेकांचे साहित्य जप्त केले. त्यानंतर आठवडाभर या रस्त्यावर एकही दुकान लागले नाही.

परंतु, हा दिलासा क्षणिक ठरला. विक्रेत्यांनी पोलिसांना न घाबरता पुन्हा रस्त्यावर ठाण मांडले. पोलिसांना माहिती मिळताच मंगळवारी सायंकाळी पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक किशोर सोलव यांनी मोठा पोलीस ताफा तैनात केला. एकाच वेळी सर्व ठेलेचालकांवर कारवाईचा धडाका सुरू केला. काही मिनिटातच रस्त्यावरील सर्व अवैध हातठेले बंद करण्यात आले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली. परंतु, पोलीस परत फिरताच पुन्हा दुकाने थाटण्यात आली.

रस्त्यावर खाद्यपदार्थाची दुकाने लागल्यास वारंवार कारवाई करण्यात येईल. वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्यास थेट दंडात्मक कारवाई करण्यात येईल. आम्ही आमच्या कर्तव्याप्रती सजग आहोत. – प्रभावती एकुरके, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा,सोनेगा.

रस्त्यावर किंवा पदपथावर विक्रेत्यांनी अतिक्रमण  केल्यास महापालिकेचे पथक पुन्हा कारवाई करणार.  – अशोक पाटील, उपायुक्त, महापालिका.