नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०१९ मध्ये अयोध्या जमीन वादावर ऐतिहासिक आणि बहुप्रतिक्षित निर्णय दिला. पाच न्यायमूर्तींच्या संविधान पीठाने सर्वानुमते निकाल देत वादग्रस्त २.७७ एकर जमीन ‘रामलल्ला विराजमान’ या पक्षकाराच्या नावे मंदिर उभारणीसाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास’ला सुपूर्द करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर मुस्लिम पक्षकारांना न्याय मिळावा यासाठी अयोध्येतच पाच एकर पर्यायी जमीन मशिदीसाठी देण्याचे निर्देश सरकारला दिले. न्यायालयाने निकालात स्पष्ट केले की १९९२ मध्ये झालेला बाबरी मशीद पाडण्याचा प्रकार हा बेकायदेशीर होता आणि संविधानाच्या मूल्यांना धक्का देणारा होता. मात्र आता तत्कालीन खंडपीठातील न्यायमूर्ती आणि देशाचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी या निकालावर मोठे विधान केले आहे. बाबरी मशीद उभारण्याबाबत त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले माजी सरन्यायाधीश?
माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी अयोध्या वादावर केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. न्यूजलॉन्ड्रीचे पत्रकार श्रीनिवासन जैन यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बाबरी मशीद उभारणे हेच मूळ “अपवित्रतेचे कृत्य” होते, असे म्हटले. जैन यांनी प्रश्न केला की, १९४९ मध्ये हिंदू पक्षांनी मशिदीत मूर्ती ठेवणे किंवा इतर प्रकारची तोडफोड करणे हीसुद्धा अपवित्रतेची कृत्ये होती का? यावर प्रत्युत्तर देताना माजी सरन्यायाधीश म्हणाले – “मूळ अपवित्रतेचे कृत्य म्हणजेच त्या मशिदीचे बांधकाम होते.
आपण ते विसरतो का? इतिहासात जे घडले ते दुर्लक्षित करता येणार नाही.” त्यांनी पुढे सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या २०१९ च्या निकालात पुरातत्त्वीय पुरावे नमूद आहेत. त्या पुराव्यांवरून मशिदीखाली मंदिराचे अवशेष असल्याचे सिद्ध होते. “इतिहासात जे काही झाले ते पुराव्याच्या स्वरूपात आपल्यासमोर आहे, ते आपण नजरेआड करू शकत नाही,” असे ते म्हणाले. मात्र, जैन यांनी निदर्शनास आणून दिले की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात स्पष्टपणे म्हटले आहे – मशिद बांधण्यासाठी मंदिर पाडण्यात आले, याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. तसेच मशिद आणि खालच्या रचनेत शतकांचा मोठा फरक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले होते.
यावर माजी सरन्यायाधीश म्हणाले की, पुरातत्त्व खात्याचा अहवाल हा स्वतः एक पुरावा आहे. त्याचे मूल्यांकन कसे करायचे हा वेगळा प्रश्न आहे. “निकालावर टीका करणाऱ्यांनी निकाल व्यवस्थित वाचलेला नाही. ते फक्त निवडक इतिहासावर भर देतात आणि बाकी सर्व विसरतात,” असे त्यांनी म्हटले. मशिदीचे बांधकाम जर अपवित्रतेचे कृत्य होते, तर तिला पाडणे योग्य ठरेल का? असा प्रश्न जैन यांनी केला. त्यावर चंद्रचूड यांनी स्पष्ट केले – “असे अजिबात नाही. निकाल हा केवळ कायदेशीर तत्त्वांवर, पुराव्यांच्या आधारे आणि पारंपरिक मापदंड लावूनच दिला आहे. तो केवळ श्रद्धेवर आधारलेला आहे, अशी टीका चुकीची आहे.”