चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या ३५० पेक्षा अधिक आहे. ताडोबा कोर क्षेत्रापेक्षा बफर क्षेत्रात वाघांची संख्या अधिक आहे. या जिल्ह्यातील मानव वन्यजीव संघर्ष कमी करायचा असेल तर येथील वाघ तातडीने इतर जिल्ह्यात पाठविणे आवश्यक झाले आहे. तेव्हा महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यात जंगल आहे. मात्र वाघांची संख्या कमी आहे तिथे वाघ स्थलांतरित करा असा उपाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू माजी मंत्री शोभा फडणवीस यांनी सुचविला आहे.

या जिल्ह्यात मागील नऊ दिवसात वाघाने चार जणांचा बळी घेतला. गोंडपिंपरी तालुक्यात दोन जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेला आहे. त्यामुळे सोमवारी गोंडपिंपरी येथे ग्रामस्थानी आंदोलन करीत तब्बल नऊ तास नागपूर – अहेरी मार्गावरील वाहतूक बंद केली होती. त्यामुळे येथे तणाव निर्माण झाला होता. ग्रामस्थांच्या आंदोलनाची दखल घेत माजी मंत्री शोभा फडणवीस घटनास्थळी पोहचल्या. यावेळी त्यांनी वन विभागाला जिल्ह्यातील वाघ लवकरात लवकर इतर जिल्ह्यात स्थलांतरित करण्यात यावे अशी सूचना केली. या जिल्ह्यात वाघ-मानव संघर्षाने टोक गाठले आहे. नऊ दिवसात चार शेतकऱ्यांचा बळी वाघाने घेतला.

वाघ-मानव संघर्षावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू, माजी मंत्री शोभा फडणवीस म्हणाल्यात, जिल्हात वाघाची संख्या वाढली आहे. त्यामुळे ते गावाकडे येत आहेत. वनविभाग आणि जनता यांच्यातील संवाद तुटला आहे. वनविभागाने गावाकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे. ३५० वाघ जिल्हात आहेत. यांची संख्या कमी करणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे बफरमध्ये वाघाची संख्या वाढली आहे.त्यामानाने जंगल डाट नाही, मात्र जंगलालगत असलेली गावे अधिक आहेत.वाघ-मानव संघर्ष टाळण्यासाठी वाघाची संख्या कमी करणे हा प्रभावी उपाय आहे. तेव्हा वाघांची इतर जिल्ह्यात रवानगी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट जंगलात वाघ कमी आहे तिथेही वाघ हलविता येईल असेही त्या म्हणाल्या.