नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक वाघांची संख्या आहे आणि याच जिल्ह्यात मानव-वाघ संघर्षही आहे. जिल्ह्यातील मूल, सावली आणि ब्रम्हपूरी तालुक्यात वाघांच्या हल्ल्यात होणारे माणसांचे मृत्यूदेखील सर्वाधिक आहेत. त्यामुळे काहीही करा, पण हा संघर्ष थांबवा, माणसांचे मृत्यू थांबवा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू व माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केली.
नुकतीच त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेतली. चंद्रपूर जिल्ह्यात विशेषत: मुल, सावली व ब्रम्हपूरी तालुक्यात वाघांच्या हल्ल्यात होत असलेली मनुष्यहानी रोखण्याबाबत तसेच चंद्रपूर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय वाइल्डकॉन सेमिनारमध्ये मांडलेल्या सूचनांवर निर्णय होण्याबाबत त्यांनी चर्चा केली. चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढतच आहे आणि हेच वाघ आता गावात येऊन धुमाकूळ घालत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, या वाघांवरुन मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी एप्रिल महिन्यात महायुती सरकारवर निशाणा साधला होता. यापूर्वीदेखील अनेकदा त्यांनी वाघांच्या विरोधातच वक्तव्य केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या काकू व्याघ्रसंवर्धनाच्या विरोधात असल्याचीच चर्चा व्याघ्रसंवर्धकांमध्ये आहे. शोभाताई फडणवीस यांनी सातत्याने वाघांच्या विरोधातच भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांच्या काकूंनी यापूर्वी देखील २०१४ मध्ये आमदार असताना पोंभूर्णा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली होती.
वनखात्यावर त्यांनी एवढा दबाव टाकला की त्यावेळी त्या वाघाला थेट गोळी घालून ठार करण्यात आले. त्यानंतर २०२२ मध्येही त्यांनी धूमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा, अन्यथा जंगल पेटवून देऊ, अशी थेट धमकीच दिली होती. तर आता पुन्हा एकदा त्यांनी वाघाच्या बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्यामुळे त्यांना व्याघ्रसंवर्धन नको आहे का, असा प्रश्न आता वन्यजीवप्रेमी उपस्थित करत आहेत.
चंद्रपूरात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावरून मुख्यमंत्र्यांच्या काकू शोभा फडणवीस यांनी थेट महायुती सरकारवरच निशाणा साधला. वाघांना आमच्यापासून दूर घेऊन जा. वाघांची ‘ट्रान्सफर’ करा आणि बाहेर पाठवा. वाघांची संख्या वाढतच गेली तर आम्ही झाडावर राहू आणि वाघ खाली फिरत राहतील. आमची अवस्था का जंगली करणार आहात का, असा संतप्त सवाल शोभा फडणवीस यांनी सरकारला केला होता. वाघांना बाहेर पाठवा, इथले वाघ कमी करा, आम्हाला सुरक्षितता द्या, नाही तर केव्हाही जनतेच्या भावनांचा उद्रेक होवू शकतो, असा इशारा शोभा फडणवीस यांनी एप्रिल महिन्यात दिला होता.