भंडारा : भंडारा येथील दिवाळी मिलन कार्यक्रमात भंडारा नगरपिषदेत मोठा भ्रष्टाचार व २० – ३०% कमिशनखोरी झाल्याचा दावा सत्ताधारी पक्षातील एका भाजप नेत्याने केला. सोबतच नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आल्यास, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे जाहीर वक्तव्य माजी मंत्री असलेल्या भाजप नेत्याने राज्याचे गृह राज्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत केले. हाच धागा पकडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी माजी मंत्री यांना खुलासा करण्याची मागणी करत ते माजी मंत्री आता स्वतःचीच चौकशी लावणार काय? असा पलटवार केला आहे.
दरम्यान, माजी आमदार चरण वाघमारे म्हणाले की, एक माजी मंत्री व भंडारा गोंदियाचे भाजप नेते समजणारे एक नेते यांनी भंडारा येथील दिवाळी मिलन कार्यक्रमात एक मोठे वक्तव्य केले. भंडारा शहरात मोठ्या प्रमाणात नगर परिषदेमध्ये भ्रष्टाचार झाला व भंडाऱ्यातील एक नेता २० टक्के कमिशनखोरी करतो, असा आरोप केला. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी प्रशासक बसण्याचा अगोदर भंडारा नगरपरिषदेवर भाजपची सत्ता होती. म्हणजे पाच वर्ष सत्तेत राहून व चार वर्षे प्रशासक काळात राज्यात सत्ता महायुतीची होती. याचा अर्थ सत्ता असताना प्रशासक राज काळात नगरपरिषदेवर सरकारचाच कंट्रोल होते.
आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून माजी मंत्री यांनी कार्यकर्त्यांना व मतदारांना खोटे आश्वासन देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या वक्तव्यावर माजी मंत्र्यांनी स्वतः आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. म्हणजेच दोन्ही काळात भंडारा नगर परिषदेवर महायुतीची सत्ता होती. याचा अर्थ आता ते स्वतःची चौकशी लावणार आहेत काय असा पलटवार करत माजी मंत्र्यांनी याचा खुलासा करावा असे आव्हान वाघमारे यांनी माजी मंत्र्यांना केले आहे.
विशेष म्हणजे भंडाऱ्यातील एक नेता २० टक्के कमिशनखोरी करतो, असा आरोप सत्ताधारी पक्षाचे नेते आ. परिणय फुकेंनी केला आहे. दरम्यान ‘तो’ नेता कोण हे सांगायला मात्र फुके सध्या तयार नाही. मात्र, मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकारी प्रकरणाची चौकशी करणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीनंतर सर्वकाही बाहेर येईल, असा दावा फुकेंनी केला आहे. दरम्यान, याच मुद्यावर राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्टीकरण देत परिणय फुके यांनी भंडारा सीओबद्दल चौकशी करण्याची मागणी केली आहे, त्यात तथ्य आहे. विना मान्यता कामं दिले होते ते प्रकरण पुढे आणल्याचे म्हटले आहे.
पुढील सात दिवसात चौकशी
दरम्यान, भंडाऱ्यातील २० टक्के कमिशनच्या प्रकरणावर पुढील सात दिवसात चौकशी होऊन दूध का दूध, पानी का पानी होईल, असा दावा भाजप आमदार परिणय फुके यांनी केला आहे. आपल्या आरोपांमध्ये २० कोटींच्या नियमबाह्य कामाची यादीही पालकमंत्री पंकज भोयर यांच्याकडे सोपवली होती. त्यानंतर पंकज भोयर यांनी मुख्यमंत्र्यांचे निर्देशाप्रमाणे भंडाऱ्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसाच्या आत २०% कमिशन खोरीच्या या प्रकरणाची चौकशी करावी, असे निर्देश दिल्याचा फुकेंचा दावा आहे.
तो नेता महायुतीचा की महाविकास आघाडीचा?
कमिशनखोरी करणाऱ्या त्या नेत्याने आपल्या नातेवाईकाच्या नावाखाली एक बोगस कंपनी ही उभारली असून भंडारा आणि पवनी नगरपरिषदमधील सर्व कामे त्याच कंपनीला मिळवून दिले जाते आणि पुढे ती कंपनी छोट्या कंत्राटदारांना छोटे छोटे काम वाटून कमिशनखोरी करते, असा आरोप ही फुकेंनी केला आहे. दरम्यान, कमिशनखोरी करणारा तो नेता महायुतीचा की महाविकास आघाडीचा याचा कुठलाही स्पष्टीकरण फुके यांनी दिलेला नाही.
एका विशिष्ट पक्षासाठी राज्य गृह खात काम करते काय? – माजी आमदार चरण वाघमारे यांचा सवाल ..
भंडारा येथे दोन दिवसापूर्वी भाजप कार्यकर्त्यांच्या दिवाळी मिलन कार्यक्रमात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांचे मोबाइल, व्हॉट्सअॅप सर्व्हेलन्सवर ठेवले आहेत, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी निषेध करून कारवाई करण्याची मागणी केली होती. भंडारा जिल्ह्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. चरण वाघमारे यांनी संजय राऊत यांच्या सुरात सूर मिळवून पोलिसांनी कारवाई करावी असे म्हटले आहे. ते म्हणाले की, मंत्री बावनकुळे यांच्या ‘त्या’ जाहीर वक्तव्याची पोलिस विभाग व राज्याच्या गृह खात्याने नोंद घ्यावी व भंडारा पोलिसांनी याची तक्रार नोंदवावी असे म्हटले आहे. तक्रार नोंदवण्यासाठी कोणी तक्रार दिली पाहिजे याची आवश्यकता नाही असेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे राज्याचे गृहखात राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे असले तरी एका विशिष्ट पक्षासाठी राज्याचे गृह खाते काम करते का? असा सवाल विचारत वाघमारे यांनी सरकारलाच कोंडीत पकडले आहेत.
