अकोला : चौथ्या वर्गातील विद्यार्थिनीला नको तो स्पर्श करीत वर्ग मित्राच्या वडिलानीच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार जुने शहर पोलीस ठाण्यांतर्गत घडला आहे.या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक केली. सत्यपाल भिमराव सावध असे घात करणाऱ्या नराधम आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे आरोपीविषयी संतापाची लाट पसरली आहे.
अल्पवयीन मुली, तरुणी व महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शाळकरी मुली देखील सुरक्षित नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. जुने शहरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीचा विनयभंग झाला. पीडित मुलगी शाळेत जाण्यासाठी घरून निघाली.वर्ग मित्र आणि मैत्रिणींसोबत जाण्यासाठी त्यांच्या घराजवळ पोचली. यावेळी एका वर्ग मित्राचे वडील असलेल्या आरोपीने पीडित विद्यार्थिनीला घरात बोलावून घेतले. विद्यार्थ्याला शालेय गणवेशाची टाय लावून दे, असे आरोपीने पीडित विद्यार्थिनीला सांगितले.
दरम्यान, आरोपीने विद्यार्थिनीच्या तोंडावर हात फिरवत, अंगाला वाईट उद्देशाने स्पर्श केला. ती विद्यार्थिनी रडायला लागली. आरोपीने ५० रुपये देऊन तुझ्या आईला सांगू नको, शाळेला सुट्टी झाल्यावर परत घरी ये, असे सांगितले. विद्यार्थिनीने आरोपीला धक्का देऊन पळ काढला. या संपूर्ण प्रकारानंतर विद्यार्थिनी शाळेत आली. शाळेच्या स्वच्छतागृहाजवळ पायऱ्यावर बसून ती रडत होती.
वर्ग शिक्षिकेची नजर तिच्यावर पडली. शिक्षिकेने विद्यार्थिनीला विश्वासात घेऊन विचारणा केली. त्यावर विद्यर्थिनीने घडलेला सर्व प्रकार शिक्षिकेला सांगितला. शिक्षकेने या सर्व प्रकरणाची माहिती महिला हेल्पलाइन क्रमांकावर दिली. विद्यार्थिनीच्या वर्ग शिक्षिकेने संपर्क साधून पालकांना बोलावून घेतले. शिक्षिकेने घडलेला संपूर्ण प्रकार विद्यर्थिनीच्या पालकांना सांगितला. हा प्रकार ऐकून पालकांच्या पाया खालची वाळूच सरकली. पीडित अल्पवयीन मुलीला घेऊन पालकांनी थेट जुने शहर पोलीस ठाणे गाठले.
पालकांनी या संदर्भात लेखी तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या नराधम आरोपीविरूद्ध जुने शहर पोलिसांनी कलम ७४, ७५ बी.एन.एस., आर/डब्ल्यू ८, ९ एम, १० बाल संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून जुने शहर पोलिसांनी आरोपीला तत्काळ अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास जुने शहर पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.