लोकसत्ता टीम

नागपूर : मध्य प्रदेशात तत्कालिन मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘लाडली बहीण ’ योजना राबवून महिलांच्या बँक खात्यात विशिष्ट रक्कम जमा केली आणि सरकारविरुद्ध नाराजी असतानाही पुन्हा तेथे भाजपची सत्ता आली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महायुती सरकारने देखील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना सुरू केली आहे. त्या योजनेतून पात्र महिलांना दीड हजार रुपये महिन्याला दिले जात आहेत.

या योजनेअंतर्गंत रक्षाबंधनाच्या निमित्ताने पात्र महिल्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. आता ही रक्कम खात्यातून काढण्यासाठी गावोगावच्या बँकांमध्ये महिलांची झुंबड उडाली आहे. बँकासमोर महिलांच्या रांगा दिसू लागल्या आहेत. यामुळे लाडकी बहीण योजनेची सर्वत्र चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर भाजप ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी, माजी आमदार व लता मंगेशकर हॉस्पिटल नागपूरचे कार्यकारी अध्यक्ष डॉ आशीष देशमुख यांनी रक्षाबंधनानिमित्त सर्व लाडक्या बहिणींसाठी लता मंगेशकर मातृत्व योजना आणली आहे.

आणखी वाचा-चंद्रपूर : समाज माध्यमावरील मैत्री तरूणीला भोवली, प्रकरण पोलिसांत

“रक्षाबंधननिमित्त माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी लता मंगेशकर मातृत्व योजना सुरू करताना अत्यंत आनंद होत आहे. या योजनेअंतर्गत लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूर येथे भरती असलेल्या गर्भवती भगिनींची नि:शुल्क ‘नॉर्मल डिलिव्हरी’ व नि:शुल्क ‘सिझेरियन डिलिव्हरी’ करण्यात येणार आहे. सोबतच, भरती असलेल्या गर्भवती भगिनींच्या सर्व तपासण्या व औषध मोफत राहणार असून दररोज दोन वेळा जेवण व चहा-नाश्त्याची नि:शुल्क सोय करण्यात आलेली आहे. ओपीडीमध्ये सुद्धा गर्भवती भगिनींच्या सर्व तपासण्या, औषध व सल्ला मोफत राहणार असून बाळंतपण होईपर्यंत सर्व उपचार व औषध मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे. या निःशुल्क मातृत्व योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा”, असे आवाहन डॉ. आशीष देशमुख यांनी केले आहे. दिनांक १८ ऑगस्ट २०२४ ला कृषी उत्पन्न बाजार समिती, काटोल येथे रक्षाबंधन दिनानिमित्त आयोजित भगिनींच्या मनोमिलन कार्यक्रमात डॉ. देशमुख यांनी ही घोषणा केली.

आणखी वाचा-गडचिरोली : मोबाईल चार्जरसाठी युवतीला बेदम मारहाण; संतापाची लाट…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिलांचा सन्मान व त्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने महायुती सरकारच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून डॉ. आशीष देशमुख यांनी लता मंगेशकर मातृत्व योजना सुरू केली आहे. त्यांच्या या योजनेचे कार्यक्रमाला उपस्थित हजारो भगिनींनी स्वागत केले आणि त्यांना राखीसुध्दा बांधली.