गडचिरोली : जिल्ह्यात मागील तीन दशकांपासून दारूबंदी आहे. मात्र, यातून काहीही साध्य झाले नाही. ही बंदी फसवी असून, बनावट दारूने ऐन तारुण्यात अनेकांचा जीव जात आहे. जिल्ह्यात दारू मिळत नसल्याने पर्यटक येत नाहीत. त्यामुळे रोजगार व महसूल बुडत आहे. दारूविक्री केल्याच्या आरोपावरून युवकांवर गुन्हे नोंद होत आहेत. बंदी असूनही सर्वत्र दारूची विक्री होते. त्यामुळे दारूबंदीची समीक्षा व्हायलाच हवी, असा सूर ‘व्हिजन गडचिरोली २०२५’ या खुल्या चर्चासत्रात उमटला.

गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या ‘कर्तव्यकक्ष’ कार्यालयात दुपारी १२ ते २ या वेळेत चर्चासत्र पार पडले. यावेळी माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, अनिल तिडके, ज्येष्ठ नेते बाबूराव कोहळे, आदी उपस्थित होते.

निसर्गाची भरभरून देण, वनवैभवाने समृद्ध आणि आदिवासी परंपरा, संस्कृतीमुळे वैशिष्ट्यपूर्ण असलेला गडचिरोली जिल्हा विकासाच्या वेगळ्या टप्प्यावर आहे. मात्र, जिल्ह्यात अभियांत्रिकी, कायद्याचे ज्ञान देणारी एकही संस्था नाही. जिल्ह्यात उद्योग येत आहेत. पण, त्यावर आधारित रोजगार निर्मितीच्या शिक्षणाच्या सोयी-सुविधा आवश्यक आहेत. शिवाय, उद्योगांमध्ये स्थानिकांना प्राधान्य हवे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त झाली. आरोग्य, शिक्षण, उद्योग, बँकिंग, कृषी, पर्यटन, आदी क्षेत्रांतील मान्यवरांनी चर्चासत्रात सहभाग नोंदविला.

जिल्हा निर्मितीनंतरच्या चार दशकांच्या प्रवासातील वेगवेगळ्या टप्प्यांवर साधलेली प्रगती, विकासाचा ‘बॅकलॉग’ या विषयांवर अनेकांनी सडेतोड मत व्यक्त केले. जिल्ह्याचे वनवैभव टिकले पाहिजे, उद्योग आले पाहिजेत. पण, स्थानिकांच्या आयुष्यात त्याने काही बदल होत आहे का, जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिले पाहिजे, यासोबतच वनउपजावर आधारित रोजगार निर्मिती, सिंचनसुविधांतून शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे, सुसज्ज वाचनालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, सर्वसुविधायुक्त बगीचा, आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारे संग्रहालय निर्माण व्हावे, अशी इच्छाही अनेकांनी व्यक्त केली.

जनतेच्या अपेक्षा सरकार दरबारी मांडू : डॉ. नरोटे

गडचिरोलीच्या विकासाबाबत जनसामान्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी हा उपक्रम राबवला. जनतेच्या अपेक्षा सरकारदरबारी नेटाने मांडून त्या सोडवून घेण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिली. दरम्यान, जिल्हा निर्मितीनंतर सुरुवातीला काही वर्षे प्रशासनाच्या पुढाकाराने कार्यक्रम होत असे. यात जिल्ह्याच्या विकासावर चिंतन, जिल्ह्याच्या संस्कृतीचे दर्शन असे उपक्रम राबविले जात. मात्र, नंतर ही प्रथा बंद झाली. ४३व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हावासीयांना शुभेच्छा संदेश पाठविला. पण, जिल्हा प्रशासनाकडून कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले नाही.