गडचिरोली : इन्स्टाग्रामवर मैत्री करुन मॉडेलिंग क्षेत्रात कार्यरत एका परप्रांतीय महिलेला प्रेमात पाडले व काही दिवसांनी देसाईगंजात आणून लग्नाचे आमिष दाखवत शरीरसंबंध प्रस्थापित केले. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे तिला देहव्यापाराच्या दलदलीत ढकलले. ९ जून रोजी हा धक्कादायक प्रकार समोर आला. यातील आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित २६ वर्षीय महिला ही दिल्लीतील उत्तर- पूर्व परिसरातील आहे. आरोपीचे नाव मंजीत रामचंद्र लोणारे (४४,रा. गजानन नगरी, ब्रम्हपुरी जि. चंदपूर) आहे. २०१७ मध्ये पीडितेचा विवाह झाला होता. तिला ६ व २ वर्षांची दोन मुले आहेत. मात्र, पतीसोबत पटत नसल्याने ३ मार्च २०२४ रोजी पतीने घटस्फोट घेतला. पतीपासून विभक्त झाल्यानंतर दोन मुलांसह ती आई- वडिलांजवळ राहत होती. मॉडेलिंगची आवड असलेल्या या महिलेची इन्स्टाग्रामवरुन २४ ऑगस्ट २०२४ मध्ये मंजीत लोणारे याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांचा संवाद सुरु झाला. मॉडेलिंगच्या कामासाठी ती २७ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरला आली. यावेळी मंजीतने तिला ब्रम्हपुरीला कुटुंबासोबत भेटण्यासाठी म्हणून बोलावले. दोन दिवस ती त्याच्या घरी राहिली. त्यानंतर ती दिल्लीला परतली. २८ मे रोजी देसाईगंज ठाण्यात गुन्हा नोंद झाला, पीडिता दोन महिन्यांची गर्भवती आहे. आरोपला पूर्वीही ब्रह्मपुरी येथे देह वापराच्या प्रकरणात पत्नीसह अटक करण्यात आली होती. दरम्यान देसाईगंज पोलिसांनी या प्रकरणात घेतलेल्या भूमिकेमुळे अनेकांनी संशय व्यक्त केला आहे.

प्रेम, लग्नाचे आमिष अन् धोका

मंजीत लोणारे याने पीडितेला आपले तुझ्यावर खूप प्रेम आहे, असे सांगून जाळ्यात ओढले. त्यानंतर आपल्या पत्नीशी फारकत घेऊन तुझ्याशी लग्न करेन, नवे घर घेऊ व एकत्रित राहू, असे वचनही दिले. त्याच्यावर विश्वास ठेऊन १३ ऑक्टोबर २०२४ रोजी ती दिल्लीहून ब्रम्हपुरीत आली. मंजीत लोणारे तिला घेऊन तीन दिवस देसाईगंजच्या हॉटेल आर.आर. मध्ये राहिला. या दरम्यान त्याने वारंवार लैंगिक अत्याचार केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घर घेण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे आत्महत्या करावी लागेल, असे सांगून मंजीत लोणारे याने तिला वेश्याव्यवसायात ढकलले. १८ नाेव्हेंबर २०२४ रोजी त्याने देसाईगंजात लाखांदूर रोडवर एका सावजी हॉटेलला चिकटून किरायाने खोली केली, तेथे तिला वेश्याव्यवसायासाठी मजबूर केले. नंतर देसाईगंजातील आर.आर. हॉटेल, कुरखेडातील महामाया हॉटेलातही वेश्याव्यवसाय करवून घेतला. त्यानंतर त्याने लग्नास नकार दिला व मारहाण करण्यास सुरुवात केली.