गडचिरोली : घनदाट जंगलाचा आधार घेत भामरागड तालुक्यातील कुडकेली परिसरात चक्क विषारी बनावट दारूचा कारखाना सुरु करणाऱ्या कुख्यात दारू माफिया धर्मा निमाय रॉय (३८,चामोर्शी) आणि शुभम सपन बिश्वास (२६, ताडगाव) याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे.
१४ मे रोजी गडचिरोली पोलिसांनी ही धाडसी कारवाई केली. त्यावेळेस धुळे जिल्ह्यातील चार आरोपीना अटक करण्यात आली होती. रॉय आपले वाहन सोडून पळाला होता. कारवाईत जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गडचिरोली जिल्ह्यात तीन दशकांपासून दारूबंदी असल्याने येथे मोठ्या प्रमाणात दारू तस्करी वाढली आहे. यावर आळा बसविण्यासाठी पोलीस कारवाई करीत असले तरी यामागच्या मुख्य सूत्रधारांना पकडण्यात पोलिसांना तेवढे यश आलेले नव्हते.
दरम्यान, काही तस्करांनी कुडकेली जंगल पारिसरात बनावट देशी दारूचा कारखाना सुरु केल्याची माहिती मिळाली. हा पारिसर नक्षलग्रस्त असल्याने पोलिसांनी मोठ्या शिताफिने सापळा रचून कारखान्यावर धाड टाकली. यावेळी घटनास्थळावरून जवळपास ४० लाखांच्या मुद्देमालासह वसंत प्रदान पावरा (१९), रा.बोराडी, ता. शिरपूर, जि. थुळे, शिवदास अमरसिंग पावरा (३५) रा.धाबापाडा, ता. शिरपूर, जि. धुळे,अर्जुन तोयाराम अहिर (३श रा. धुळे, खीद्र नारायण पावरा (१८) रा. सलाईपाडा, ता शिरपूर, जि. धुळे यांना ताब्यात घेतले. कुख्यात दारू तस्कर धर्मा रॉय आणि त्याचा साथीदार शुभम बिश्वास याने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. मात्र, पोलिसांनी दोघांनाही जेरबंद केले. सर्व आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, एम.रमेश यांच्या मर्गंदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे आणि ताडगाव पोलीस ठाण्याच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली. विशेष म्हणजे कारवाईदरम्यान पोलिसांनी घनदाट जंगलात रात्र जागून काढली.
रॉयवर २५ वर्षात १५ गुन्हे
दक्षिण गडचिरोलीतील दारू तस्करीचा माफिया म्हणून धर्मा रॉय याची ओळख आहे. गेल्या २५ वर्षांपासून रॉय या अवैध व्यवसायात आहे. त्याच्यावर २००० साली पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर १५ वेळा दारू तस्करीत त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. यातील बऱ्याच प्रकरणात पुराव्याअभावी तो सुटला आहे. सुरवातीला लहान-मोठी तस्करी करणारा रॉय राजकीय आशीर्वादाने मोठी तस्करी करू लागला. यातून त्याने कोट्यवधींची माया जमवली आहे. दक्षिण गडचिरोलीतील पोलीस विभागातही त्याचे लागेबांधे आहेत. त्यामुळे अनेकदा तो मोकाट सुटायचा. मात्र, पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या दणक्याने अखेर त्याला जेरबंद करण्यात आले.
१३ लाखांचे विषारी स्पिरिट जप्त
बनावट दारू तयार करण्यासाठी अतिशय धातक स्पिरिटचा वापर केला जात होता. घटनास्थळावरून सुमारे ४ हजार ५०० लिटर स्पिरिट जप्त करण्यात आले. त्याची किंमत १३ लाख ६४ हजार रूपये एवढी आहे. सोबत ८७०० बनावट दारूच्या बाटल्या पोलिसांनी हस्तगत केल्या. ही बनावट विषारी दारू ग्राहकांपर्यंत न गेल्याने मोठा अनर्थ टळल्याची भावना पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.