गडचिरोली : रेल्वेमार्गाच्या रुळाकरिता भराव तयार करण्यासाठी तालुक्यातील पोर्ला महसूल मंडळात शासकीय जमिनीवर बेसुमार मुरूम उपसा करण्यात आला आहे. उत्खननाचे सर्व नियम धाब्यावर बसवून विनापरवाना मुरुमाची ‘लय’ लूट सुरू असताना महसूल विभाग डोळे मिटून बसला आहे.
सोबतच मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ही केली जात आहे. त्यामुळे अवैध उत्खनन करणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे प्रशासनात नेमके कोणाशी हितसंबंध, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे यापूर्वी संबंधित कंपनीला अवैध मुरूम उपसाप्रकरणी २३५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला होता. वडसा-गडचिरोली या ५२ किलोमीटर रेल्वेमार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. त्याकरिता रुळ बनविण्यासाठी भराव तयार केला जात आहे. याकरिता कंत्राटदार कंपनीने गडचिरोलीच्या पोर्ला मंडळातील पोर्ला, वसा, वसा चक, नवरगाव येथे मोठ्या प्रमाणात मुरूम उपसा केला आहे. आरमोरी तालुक्यातील चुरमुरा, किटाळी येथेही मोठमोठे खड्डे खोदून मुरुमाचे उत्खनन केले आहे.
तब्बल १० पोकलॅन व ३० ट्रकच्या माध्यमातून वारेमाप मुरूम उत्खनन केले जात असताना, महसूल विभागाने गुपचिळीची भूमिका घेतलीय. सोबतच जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड ही केली जात आहे. यावर वन विभागाने देखील कोणतीही कारवाई केलेली नाही. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क केला असता होऊ शकला नाही.वाळूनंतर मुरूम उत्खनन चर्चेत अलीकडेच भाजपचे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्ह्यात १०० कोटी रुपयांची वाळू तस्करी झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. आता मुरूम उत्खनन चर्चेत आले आहे. त्यामुळे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लक्ष देण्याची गरज आहे. सहपालकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल १५ मे रोजी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनीही आढावा घेणे आवश्यक आहे.
तहसीलदार यांच्या निलंबनाची मागणी
गडचिरोलीचे तहसीलदार संतोष आष्टीकर यांच्यासह संबंधित तलाठ्यांचे निलंबन करावे, अशी मागणी अंगारा (ता. धानोरा) येथील माजी सरपंच नंदकिशोर शेडमाके यांनी केली आहे. शेडमाके यांनी १३ मे रोजी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांना निवेदन दिले. कंत्राटदार कंपनीवर दंडात्मक कारवाईची मागणी देखील त्यांनी केली आहे.
मनुष्य, वन्यप्राण्यांच्या जीवितास धोका
नवरगाव येथे विद्युतखांब सोडून संपूर्ण परिसर खोदून मुरूम उपसा केला आहे. खोल खड्यांमध्ये पावसाळ्यात पाणी साचेल. यामुळे शेतकरी तसेच वन्यप्राणी गाळात फसण्याची शक्यता आहे. खोल खड्ड्यांतील पाण्यामुळे जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनीही मिठाची गुळणी धरली आहे.
माझ्याकडे नागपूरचाही पदभार आहे. १५ मे रोजी गडचिरोलीला येणार आहे. आल्यानंतर मुरूम उत्खनासंदर्भात तक्रारीची खातरजमा करतो, त्यानंतर आपल्याला प्रतिक्रिया देणे उचित राहील. अतुल दौड, जिल्हा खणिकर्म अधिकारी, गडचिरोली</p>