गडचिरोली : जिल्ह्यात दारूबंदी असतानाही छुप्या मार्गे अवैध विक्री तसेच तस्करी सुरूच आहे. याविरोधात पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कारवाईचे सत्र सुरू केले असून अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम येथे गुन्हे शाखेने धडक कारवाई करून तब्बल ७३ लाख ४० हजार रुपयांचा दारूसाठा उध्वस्त केला. पहाटे राबवलेल्या या कारवाईत आलिशान जीपसह दारूच्या ७३० पेट्या जप्त करण्यात आल्या असून, एका संशयिताला अटक तर तिघेजण पसार झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील मिथून विश्वास मडावी (वय ३५) हा आरोपी जीपमधून (एमएच ३४ सीडी-८४१०) दारूची वाहतूक करत असताना पोलिसांच्या तावडीत सापडला. त्याच्याकडून १५ लाख रुपये किमतीची आलिशान जीप व दारूच्या ७३० पेट्या जप्त करण्यात आल्या. मात्र, त्याचे तीन साथीदार अंधाराचा फायदा घेत फरार झाले.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्वल, अपर अधीक्षक एम. रमेश, तसेच सत्य साई कार्तिक गोकुलराज यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक निरीक्षक भगतसिंग दुल्लत, अंमलदार राजू पंचफुलीवार व दीपक लोणारे यांनी केली.
तस्करीला कुणाचे अभय?
अहेरी तालुक्याला तेलंगणा व छत्तीसगडची सीमा लागून असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात दारूची आवक होत असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, मद्दीगुडमसारख्या छोट्या गावात लाखो रुपयांची दारूसाठेबाजी सुरू असतानाही अहेरी पोलिसांना याची कल्पनाही नव्हती. स्थानिक गुन्हे शाखेने थेट कारवाई करून मोठा साठा जप्त केल्याने अहेरी पोलिसांच्या दक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दारूबंदीची समीक्षा व्हावी
आदिवासीबहुल जिल्ह्यात लोकांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होऊ नयेत, आरोग्यावर विपरित परिणाम होऊ नये, याकरिता १९९३ मध्ये दारूबंदी लागू करण्यात आली. मात्र, दारूबंदीच्या आडून सर्रास दारूची विक्री केली जाते. यातून अनेकदा बनावट दारूचीही विक्री केली जात असून यामुळे कित्येकांना जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यात दारूबंदी लागू केल्यापासून अवैध सर्रास अवैध दारू विक्री सुरु आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनावर नक्षलवाद, कायदा सुव्यवस्थेसह दारूबंदीच्या अंमलबजावणीचे देखील मोठे आव्हान आहे. यासाठी दारूबंदीची समीक्षा व्हावी अशीही मागणी सातत्याने समोर येत आहे.