गडचिरोली : मागील अनेक महिन्यांपासून गडचिरोलीच्या टोकावरील सिरोंचा तालुक्यात वाळू वाहतुकीवरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. याच परिसरातील अंकिसाजवळील मार्गावर वाळू साठ्याच्या आडून ऐन महामार्गावर अपघाताचा धोका होईल, अशा स्थितीत वाहनांच्या रांगा लावून वाहतूक केली जात होती. यासंदर्भात ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करताच जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून वाळू विक्री नियमानुसारच असल्याचा दावा केला आहे. तथापि, चौकशी सुरू असल्याचेही म्हटले आहे. यामुळे अहवाल येण्यापूर्वीच ‘क्लीन चीट’ देण्याची घाई कुणाला वाचविण्यासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘सिरोंचा तालुक्यात वाळू माफियांचा हैदोस’ या मथळ्याखाली ‘लोकसत्ता’ने १ ऑक्टोबरला वृत्त प्रकाशित केले होते. यावर जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख यांनी सिरोंचा तालुक्यातील वाळू विक्री ही शासन नियमाप्रमाणेच होत असल्याचा दावा केला. मात्र, त्याच स्पष्टीकरणात संबंधित अधिकाऱ्यांना आणि विभागाला चौकशीचे आदेश दिल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे चौकशी अहवालापूर्वीच वाळू विक्री आणि वाहतुकीची पाठराखण करणाऱ्या जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

मंत्र्यांच्या आदेशाला अधिकाऱ्यांचा खो?

काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांनी वाळू तस्करीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर प्रशासन याकडे खंबीरपणे लक्ष देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मात्र, खनिकर्म अधिकाऱ्याने सिरोंचा प्रकरणात या अपेक्षेला तिलांजली दिल्याचे चित्र आहे. त्यांनी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना प्रत्यक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच ‘एमआरएसएसी’ नागपूरच्या प्रणालीद्वारे देखरेख केली जाणार असल्याचेही म्हटले. मात्र, चौकशीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच खनिकर्म विभागाकडून लगेच स्पष्टीकरण आल्याने सिरोंचा परिसरातील नागरिकांसह प्रशासकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.