गडचिरोली : राज्याच्या शेवटच्या टोकावरील जिल्हा ही ओळख पुसून ‘महाराष्ट्राचे प्रवेशद्वार’ म्हणून गडचिरोलीचा विकास करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जिल्ह्यात दळणवळण आणि उद्योगांचे जाळे निर्माण होत असतानाच, आता ‘आरोग्यक्रांती’च्या दिशेनेही निर्णायक पाऊल पडले आहे. पुण्यातील रुबी हॉस्पिटल आणि राणा ग्रुपच्या वतीने सिरोंचा तालुक्यातील राजेश्वरपल्ली येथे उभारण्यात येणाऱ्या ३५० खाटांच्या मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाची पायाभरणी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली. हा १४६८ कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमेवरील विकासाचा नवा अध्याय सुरू करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

सिरोंचा येथे २६४ एकर जागेवर साकार होणाऱ्या या भव्य संकुलात मल्टिस्पेशालिटी रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय आणि एकात्मिक शैक्षणिक संकुलाचाही समावेश आहे. या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी राणा शिपिंग कंपनीचे संचालक राणा सूर्यवंशी, रुबी हॉस्पिटलचे संचालक डॉ. परवेझ ग्रँट, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार हेमंत पाटील, नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोलीच्या बदलत्या प्रतिमेवर भर दिला. ते म्हणाले, “दुर्गम भागात अनेकदा आरोग्य सुविधा तोकड्या पडत होत्या. रुग्णांना उपचारासाठी इतर जिल्ह्यांत किंवा शेजारच्या राज्यांत जावे लागत होते. मात्र, या अत्याधुनिक रुग्णालयामुळे केवळ गडचिरोलीच नव्हे, तर शेजारच्या दोन राज्यांतील नागरिकांनाही जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.” अस्थिरोग, स्त्रीरोग, कर्करोग तसेच अन्य गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी येथे आधुनिक सुविधा मिळतील. तसेच, राज्य आणि केंद्र सरकारच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत यांसारख्या सर्व आरोग्य योजनांचा लाभ रुग्णांना या रुग्णालयात घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यात कार्यरत असलेल्या राणा ग्रुपने थेट गडचिरोलीसारख्या भागात रुग्णालय उभारण्याची तयारी दर्शवून मोठे सामाजिक भान जपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी राणा सूर्यवंशी यांचे विशेष गौरवोद्गार काढले.

शैक्षणिक संकुलातून शिक्षणाला बळ

याच संकुलात वैद्यकीय, अभियांत्रिकी, दंत आणि नर्सिंग महाविद्यालयेही उभारली जाणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह, ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन केंद्राचीही निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे, या शैक्षणिक संकुलात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘स्टार लिंक’द्वारे सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी

गडचिरोली आणि नंदूरबारसारख्या दुर्गम, आदिवासीबहुल भागांमध्ये कनेक्टिव्हिटीची मोठी समस्या आहे. ही अडचण दूर करण्यासाठी मोबाईल टॉवरवर अवलंबून न राहता, थेट सॅटेलाईटद्वारे इंटरनेट सुविधा देण्याबाबत ‘स्टार लिंक’ या कंपनीशी चर्चा सुरू आहे. याद्वारे या भागातील संपर्क व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.