गडचिरोली : विमानतळासाठी सुपीक शेतजमिनीच्या भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध बघता प्रशासन प्रस्तावित जागेत बदल करणार असल्याची माहिती सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांनी दिली. त्यासाठी पर्यायी जागेचा शोधदेखील सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे शहराजवळील नवेगाव, मुरखळा, पुलखल, मुडझा (बु.) व मुडझा (तु.) भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ॲड. जयस्वाल २३ जूनला जिल्हा दौऱ्यावर होते. जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतल्यावर सायंकाळी सहा वाजता त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार डॉ. मिलिंद नरोटे, आमदार रामदास मसराम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे उपस्थित होते. देसाईगंजमध्ये ‘जेएसडब्ल्यू’ या कंपनीच्या नियोजित उद्योगासाठी, तसेच गडचिरोलीजवळ विमानतळ उभारण्यासाठी नियोजित भूसंपादनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे.

यानुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सहपालकमंत्री ॲड. जयस्वाल म्हणाले, १ जूनला विमानतळाच्या भूसंपादनाबाबत काही शेतकरी भेेटले होते. कोटगल येथे सिंचनासाठी मोठा प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पाखालील सुपीक जमिनी विमानतळासाठी घेऊ नयेत, अशी त्यांची मागणी होती. ते आर्त भावनेने बोलत होते, त्यामुळे ही बाब ६ जूनला जिल्हा दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवली. त्यानंतर त्याच दिवशी विमानतळासाठी पर्यायी जागा शोधण्याचा निर्णय झाला. देसाईगंजमध्येही विरोध आहे, पण भूसंपादन कायद्यान्वये योग्य ती भरपाई देऊन, कोणाचे नुकसान न करता उद्योगांचा विस्तार करणे हे सरकारचे धोरण आहे, असे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बेतकाठी पूल कामाची चौकशी

कोरची तालुक्यातील बेतकाठी, नाडेकल, डोली टोला (बामनदेव) या मार्गावरील खोब्रागडी नदीवरील पूल बांधकाम पूर्ण होण्याआधीच कोसळला. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी १६ जूनपासून सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे व सहकारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आहेत. कुडवे यांनी सहपालकमंत्री ॲड. आशीष जयस्वाल यांची भेट घेत निवेदन दिले. यावर सहपालकमंत्री जयस्वाल यांनी, बेतकाठी पुलाच्या कामाची चौकशी होणार, संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले.