गडचिराेली : जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त कक्ष अधिकारी कल्पना केशव उंदिरवाडे (६४) यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर चौथ्या दिवशी यश आले. उंदिरवाडे यांच्याकडे यांचा मारेकरी त्यांचा भाडेकरूच निघाला. विशाल ईश्वर वाळके (४०, रा. एटापल्ली) असे त्याचे नाव आहे. गडचिरोली पोलिसांसह गुन्हे शाखेने पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातून गुरुवारी त्याच्या मुसक्या आवळल्या. आर्थिक विवंचनेतून दागिने चोरीच्या हेतूने तसेच उंदिरवाडे यांच्यासोबतच्या पूर्ववैमनस्यातून त्याने थंड डोक्याने खून केल्याचे निष्पन्न झाले.
उंदिरवाडे यांचा १३ एप्रिलला दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास खून झाला होता. मृत कल्पना यांचे बंधू व पोलीस उपनिरीक्षक मोहन सोनकुसरे यांच्या फिर्यादीवरून गडचिराेली ठाण्यात अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा नोंद झाला होता. कल्पना यांच्या डोक्यात जोरदार प्रहार करून त्यांचा खून करण्यात आला. मारेकऱ्याने घटनास्थळी कुठलेही पुरावे सोडले नव्हते, त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते.
पोलिसांनी सर्व बाजूंनी तपास सुरू केला. त्यांच्याकडे राहत असलेल्या भाडेकरूंपैकी वाळके हा घटना घडल्यापासून पोलिसांसमोर येत नव्हता. कधी मोबाइल बंद तर कधी सुरू ठेवत असे. त्याचे वर्तन संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी संशयाची सूई त्याच्याकडे फिरवली. याचदरम्यान तो पुण्याला पळून गेला. पोलिसांनी त्याला पुण्यातून अटक केली.
यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक यतीश देशमुख, उपअधीक्षक सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली ठाण्याचे निरीक्षक रेवचंद सिंगनजूडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अरुण फेगडे, सहायक निरीक्षक भगतसिंग दुल्लत, राहुल आव्हाड, विजय चव्हाण, उपनिरीक्षक दीपक चव्हाण, विशाखा म्हेत्रे व अंमलदारांनी ही कारवाई केली.
पैसे परत मागल्याचाही राग
आराेपी वाळके हा उंदिरवाडे यांच्या घरी दाेन वर्षांपासून भाड्याने राहत हाेता. तो आर्थिक विवंचनेत होता. यातून पत्नीला मारहाण करत असे. कौटुंबिक कलहातून पत्नी त्यास सोडून माहेरी गेली. सध्या तो आठ वर्षांचा मुलगा व आईसोबत राहत असे. वर्षभरापूर्वी उंदिरवाडे यांच्याकडून त्याने उसणे पैसे घेतले होते. पैसे परत मागितल्याने कल्पना यांच्याबद्दल त्याच्या मनात राग होता. त्यानंतर कल्पना यांनी त्यास घर सोडून जाण्यास सांगितले होते. काही दिवस त्याने अबोला धरला होता.
थंड डोक्याने काढला काटा
कल्पना यांच्या गळ्यातील दागिने लुटण्यासाठी त्याच्या डोक्यात खुनाचा कट शिजत होता. त्यासाठी त्याने घटनेच्या १५ दिवस आधीपासून कल्पना यांच्याशी गोड बाेलणे सुरू केले होते. त्या आजारी असताना स्वयंपाक बनवून देऊ का, अशी विचारणा करत त्याने त्यांचा विश्वास संपादन करण्याचाही प्रयत्न केला होता, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. होळीला त्याने आईला गावी सोडले होते, त्यानंतर आईला परत आणले नाही. घटनेच्या दोन दिवस आधी आठ वर्षांच्या मुलालाही तो गावी सोडून आला व १३ एप्रिलला कल्पना यांचा थंड डोक्याने खून केला.
केवळ सोनसाखळी घेऊन झाला पसार
खुनानंतर त्याला कल्पना यांच्या गळ्यातील सर्व दागिने ओरबाडायचे होते, पण तो घाबरून गेला. त्यामुळे केवळ सोनसाखळी हिसकावली व इतर दागिने तसेच ठेऊन पळाला. संशय येऊ नये म्हणून तो खुनानंतर दोन दिवस घरीच होता. यानंतर त्याने सोनसाखळी चामोर्शीतील एका सराफा व्यापाऱ्यास विकली. कल्पना यांच्या दत्तकपुत्रावर खुनाचा आळ यावा, यासाठी त्याने जवळच्या लोकांमध्ये अफवा पसरवली. मात्र त्याचे संशयास्पद वर्तन व एका सीसीटीव्ही फुटेजमधील त्याच्या हालचाली, यांवरून अखेर त्याचे बिंग फुटले.