ताशांचा गजर, लेझिम पथकांचे पदलालित्य, शिस्तबद्ध ढोल पथकांचे संचालन आणि सोबतीला उत्साहाला आलेल्या उधाणावर मात करत बुधवारी लाडक्या गणरायाचे नागपूरकरांनी अभूतपूर्व जल्लोषात स्वागत केले. गणेश मिरवणूकांच्या आकर्षणाचे केंद्र असलेली चितारओळ, इतवारी, बडकस चौक, गांधी पुतळा, सिताबर्डी, धरमपेठेसह संपूर्ण शहर दिवसभर गणरायाच्या स्वागतासाठी ओसंडून वाहत होते.
पुढचे दहा दिवस लाडक्या बाप्पाचा घर आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मुक्काम असल्याने नागपूरकरांच्या उत्साहाला उधाण आल्याचे दिसले. मार्च महिन्यात झालेल्या जातीय दंगलीच्या जखमांवर पांघरूण घालत महालकडून निघालेल्या गणरायाच्या अनेक मिरवणूकांवर मुस्लिम धर्मातल्या शांतताप्रिय नागरिकांनीही गुलाबपाकळ्यांची अभूतपूर्व पुष्पवृष्टी केली. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर घोंघावत असलेले तणावाचे विघ्न लंबोदराने दूर केल्याने पोलीसही सुटकेचा निःश्वास टाकत गणरायापुढे नतमस्तक झाले.
विघ्नहर्ता गणरायाचे ब्रह्ममुहूर्तावर घरात स्वागत करण्यासाठी नागपूरकरांची पावले सकाळीच चितारओळीच्या दिशेने निघाली. साग्रसंगित, गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणरायाची घरात प्रतिष्ठापना करताच सकाळी सात पासून सुरू झालेल्या आरत्यांनी अवघा परिसर निनादून गेला.
जस जसा दिवस पुढे सरकत होता, तस तशी गणेश मंडळातील सदस्यांची गणरायाचे सभामंडपात स्वागत करण्यासाठी लगबग सुरू झाली. दुपारपर्यंत संपूर्ण चितारओळ आणि सेंट्रल एव्हेन्यूचा परिसर गर्दीने ओसंडून वाहू लागला. एकीकडे उत्साहाला उधाण आलेले असतानाच गुलालासोबत आकाशातून पावसाने सरींच्या अक्षतांची उधळण केली.
पावसाच्या सरींसह आलेला बाप्पा यंदाच्या गणेशोत्सवात घामांमध्ये न्हाऊन निघालेल्यांसाठी आनंददायी ठरला. वातावरण आल्हाददायक झाल्याने भक्तांचा उत्साह आणखीनच वाढला.शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या इतवारीत तर पाय ठेवायलाही जागा नव्हती. रस्ते, गल्लीबोळ, मंडळांचे मंडप आणि घराघरांत बाप्पांचे आगमन उत्साहत झाले.
महाल, बडकस चौकासोबतच धरमपेठ, सिताबर्डी, गोकूळपेठ, धरमपेठ, रामदासपेठ, प्रतापनगर, सक्कदरा, तुकडोजी पुतळा, नंदनवन, सदर, जरिपटका, हिंगणा, गिट्टीखदान, पासून ते नव्याने वसलेल्या बेसा- बेलतरोडीतला संपूर्ण परिससही गणरायाच्या उत्साहात अक्षरशः न्हाऊन निघाला.
मोठ्या गणेश मंडळांनी सजवलेल्या रथांवर, पारंपरिक ढोलपथके, लहान मुलांचे आकर्षक वेश, आणि सांस्कृतिक देखावे लक्ष वेधून घेत होते. अनेक गणेश मंडळांनी यंदा पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची स्थापना केली असून, लोकांनीही घरगुती बाप्पांची मिरवणूक अत्यंत श्रद्धेने आणि साधेपणाने काढली. बप्पाला घरी विराजमान करण्यासठी महाल, इतवारी, झेंडा चौक, किराणाओळ, आझाद चौक, बडकस चौक, आयाचित मंदिर अशा जवळच्या नागपूरकरांनी अनवाणी पायाने डोक्यावर बप्पाची मूर्ती घेऊन घर गाठले. महालमधील गर्दी लक्षात घेता मेट्रोच्या मार्गावर असलेल्या अनेकांनी गणरायाचे घरात स्वागत करण्यासाठी चितारओळी गाठत गणरायाला सोबत घेऊन मेट्रोमधून बाप्पाला घरी आणले. त्यामुळे सकाळपासून दिवसभर मेट्रोमध्येही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष कानीपडत होता.