Ganeshotsav 2025 : अमरावती : दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावतीतील गणेशोत्‍सवाच्‍या माध्‍यमातून नागरिकांना विविध तीर्थस्‍थळांचे दर्शन घेण्‍याची संधी प्राप्‍त झाली असून शहरातील सार्वज‍निक गणेशोत्सव मंडळांनी साकारलेले ऐतिहासिक मंदिराचे देखावे तसेच भव्य प्रवेशद्वार लक्षवेधी ठरत आहे. काही मंडळांनी केलेली सजावट देखील आकर्षक ठरली आहे.

येथील आझाद हिंद मंडळाच्या ९८ व्या सार्वजनिक गणेशोत्सवात यंदा शिर्डी येथील साईबाबा मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. साईबाबांची मूर्ती, मंदिराचा काळ्या पाषणातील गाभारा, संगमवरी कठडे, सभागृहाच्या मध्यभागी झुंबर, कोरीव खांब, सोनेरी नक्षीदार पाट्या आणि सिंहासन असा देखावा आझाद हिंद मंडळाने साकारला आहे. याआधी मंडळाने पंढरीची वारी, लासूर मंदिर, श्रीकृष्ण लिला, १२ ज्योतिर्लिंग, अक्षरधार मंदिर, असे विविध देखावे साकारले आहेत.

बुधवारा येथील निळकंठ व्यायाम मंडळाने पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. पंढरपुरच्या विठ्ठल मंदिराच्या प्रतिकृतीसाठी अकोल्याचे दीपक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २५ दिवस परिश्रम घेतले. मंदिराच्या प्रतिकृतीत विविध द्वारे आणि संलग्न मंदिरेही समाविष्ट आहेत.

पिंपळाच्या झाडात श्री गणेशाची मूर्ती एक वर्षाआधी कोरून त्यांची कायमस्वरूपी प्रतिष्ठापना श्रीकृष्णपेठ येथील गणेशोत्सव मंडळाने केली आहे. या सृष्टी विनायकाच्या भेटीसाठी त्यांचे बंधू कार्तिकेय आले, या संकल्पनेवर आधारित आरास आणि देखावा यंदा साकारण्यात आला आहे.

खापर्डे बगिचा येथील न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाने यंदा आकर्षक अशी सजावट आणि आरास तयार केली आहे. विदर्भाचा राजा म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे. शहरातील मुख्य मार्गावरून निघणारी विसर्जन मिरवणूक विशेष आकर्षण असते. दरवर्षी अनंत चतुर्दशीनंतर काही दिवसांनी मिरवणूक काढली जाते. यंदा ११ सप्टेंबर रोजी ही मिरवणूक निघणार आहे.

शहरातील सायन्सकोर मैदानावरील श्री रुक्मिणी गणेशोत्सव मंडळाने यंदा अक्षरधााम मंदिराची प्रतिकृती आणि सजावट केली आहे. सुमारे ७० फूट उंच आणि ४० फूट लांबी, रुंदीचे हे मंदिर आकर्षण ठरले आहे. अक्षरधाम मंदिराचा देखावा तयार करण्यासाठी ५० कलाकारांची चमू गेल्या दोन महिन्यांपासून परिश्रम घेत होती. मंदिराच्या गाभाऱ्यात पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई येथील श्रींच्या मूर्तीप्रमाणे गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

कठोरा नाका परिसरातील संघर्ष गणेशोत्सव मंडळाने तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. मंडळांनी भाविकांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था केली आहे. विविध समित्यांच्या माध्यमातून पार्किंग, गर्दी नियंत्रण आणि विविध कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. या देखाव्यांना पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.