‘मोक्का’ १३, ‘एमपीडीए’ अंतर्गत ४१ जणांवर कारवाई

दहशत पसरवून लोकांकडून पैसा उकळणाऱ्या शहरातील गुंडांच्या नाकात पोलिसांनी कारवाईची वेसण अडकवली आहे.  ‘मोक्का’ १३, ‘एमपीडीए’ अंतर्गत ४१ जणांवर कारवाई केल्याने अनेक गुंड घराबाहेर पडायलाही घाबरत असल्याची माहिती समोर येत आहे.

अवैध धंद्यांमध्ये प्रचंड पैसा असतो. अनेक गुंड अवैध धद्यांच्या माध्यमातून कमी वेळात अधिकाधिक पैसा कमावण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते समाजात दहशत पसरवतात. अनेकदा, खून, खुनाचा प्रयत्न, जीवघेणा हल्ला करणे, वस्त्यांमध्ये शिवीगाळ करणे व स्वत:जवळ शस्त्र बाळगण्याचे गंभीर प्रकार ते अवलंबतात. सर्वसामान्य माणूस गुंडांच्या तोंडाला कसे लागावे, असे म्हणून शांत बसतो. जीवाच्या भीतीने काहीजण गुंडांचे अत्याचार सहन करतात. पण, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पोलीस अभिलेखावर असलेल्या गुंडांवर कठोर कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्याची योजना आखली. एकटय़ाने गुन्हे करणाऱ्यांवर महाराष्ट्र धोकादायक कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करून अनेकांना वर्षभराकरिता कारागृहात पाठवले. आतापर्यंत एकूण ४१ गुंडांवर ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर संघटितपणे गुन्हे करणाऱ्या गुंडांच्या टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई केली. आतापर्यंत १३ टोळ्यांवर अशी कारवाई झाली आहे. यामुळे गुन्हेगारी वर्तुळात भीतीचे वातावरण असून गुंड संघटितपणे फिरणे टाळत आहेत. काही गुंड तर घरातून बाहेरही पडत नसल्याची माहिती गुन्हेगारी वर्तुळातून प्राप्त होते.

आंबेकरवरील कारवाईमुळे पोलिसांचा धाक वाढला

स्वत:ला शहरातील गुन्हेगारीचा डॉन समजणाऱ्या संतोष आंबेकरला पोलिसांनी अटक करून त्याच्याविरुद्ध आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल केले आहेत. त्याच्या टोळीविरुद्ध मोक्का लागला असून पोलिसांनी आंबेकरवर फास आवळल्याने शहरापासून कामठीपर्यंत अनेक मोठय़ा व व्हाईट कॉलर गुंडांना घाम फुटला आहे. आंबेकरच्या संपर्कात असणारे अनेकजण अडचणीत येणार असल्याने गुन्हेगारी विश्वात भीतीचे वातावरण आहे.

पहिल्या दिवसापासून गुंडांचा लेखाजोखा तयार करण्यात आला. समाजात दहशत पसरवणाऱ्या गुंडांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. एमपीडीए व मोक्का अंतर्गत कारवाई करून त्यांना कारागृहात डांबण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई होत आहे. गल्लीबोळात गुंडगिरी करून स्वत:ला भाई समजाणाऱ्यांची जागा कारागृहातच आहे.

– डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त.