नागपूर : नागपूर महापालिकेच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाला सतरंजीपुरा झोन मधील लालनगर भागात नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. या अभियानांतर्गत लालनगर भागातील एका जुन्या ‘जी.व्ही.पी. पॉइंट’ अर्थात मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जाणाऱ्या ठिकाणची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली, तसेच नागरिकांनी पुन्हा कचरा फेकू नये, यासाठी या जागेचे आकर्षक सौंदर्यीकरण करण्यात आले.
आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात, अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांच्या नेतृत्वात उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्या देखरेखीत विशेष चमू कार्य करीत आहे. महापालिकेच्या चमूने स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने हा पॉइंट पूर्णपणे स्वच्छ केला. यानंतर, भविष्यात इथे कोणीही कचरा टाकू नये यासाठी तिथे वॉल पेंटिंग करण्यात आले. तसेच ‘वेस्ट टू बेस्ट अर्थात कचऱ्यापासून सर्वोत्तम कलाकृती या संकल्पनेचा वापर करून त्या जागेला एक आकर्षक आणि प्रेरणादायी स्वरूप देण्यात आले. या अभिनव कल्पनेचे केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत मिशन शहरने’ आपल्या अधिकृत सोशल मीडिया स्थळांवर शेअर करीत कौतुक केले आहे.
अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी या कार्याबद्दल कौतुक केले. यावेळी स्वच्छता आणि सौंदर्यीकरण अभियानात स्थानिक नागरिकांनी केवळ उपस्थिती नव्हे, तर सक्रियरित्या सहभाग नोंदविला. नागरिकांनी स्वतःच्या हाताने साफसफाईच्या कामात मदत केली आणि परिसराच्या या बदलाचे तोंडभरून कौतुक केले.
महापालिकेने नागपूरमधील लालनगर येथील कचऱ्याच्या पॉइंटला नवा चेहरा देऊन सेल्फी पॉइंटमध्ये रूपांतर केले आहे. पूर्वी दुर्गंधी आणि घाण यामुळे नागरिकांसाठी त्रासदायक ठरलेले हे ठिकाण आता स्थानिक रहिवासी आणि युवकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपल्या घरातून निघणारा कचरा स्रोत-स्तरावर वर्गीकृत करावा आणि फक्त महापालिकेच्या अधिकृत गाड्यांनाच कचरा द्यावा.
रंगबेरंगी चित्रकला, वृक्षारोपण आणि भिंतींवर लिहिलेले स्वच्छतेचे संदेश नागरिकांना केवळ आकर्षित करत नाहीत, तर स्वच्छतेचं महत्त्वही पटवून देत आहेत.
नागपूर महापालिकेने सार्वजनिक जागा कचरामुक्त करीत तो परिसर सुंदर करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. झोपडपट्टीमधील दुर्लक्षित कोपरे परिसर कचरामुक्त करत तो परिसर सुशोभित केला आहे. कचऱ्यातील टाकाऊ टायरचा तसेच झाकणाचा वापर करत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी परिसर कचरामुक्त करत सुंदर ‘सेल्फी पाईंट’ तयार केला. तसेच आजबाजूच्या परिसराची स्वच्छता करून त्या जागेला आकर्षक बनवण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी देखील आरोग्य विभागाच्या या कामाचे कौतुक केले असून सगळ्यांसाठी हा सेल्फी पाईंट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय.