नागपूर: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांची ऑक्टोबर २०२३ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. ते आता निवृत्त होणार असल्याने आयोगाच्या अध्यक्ष पदी कुणाची वर्णी लागणार असा प्रश्न पडला आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच यासंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले असून नवीन अध्यक्ष निवडीसाठी अर्ज मागवले आहेत. यामुळे आयोगाला लवकरच नवीन अध्यक्ष मिळणार आहे. एमपीएससीसमोर अनेक प्रश्न प्रलंबित असताना अध्यक्षपदाची जबाबदारी कोण स्वीकारणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील काही वर्षात एमपीएससीच्या परीक्षा आणि निकालामध्ये प्रचंड दिरंगाई सुरू आहे.

यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. माजी अध्यक्ष निंबाळकर यांच्या कार्यकाळात एमपीएससीमध्ये अनेक बदल झाले होते. मात्र, मागील दोन वर्षाच्या काळात एमपीएससीमध्ये अनेक प्रश्न प्रलंबितच राहिले आहेत. त्यामुळे नवीन अध्यक्षांवर मोठी जबाबदारी राहणार आहे. याशिवाय आता सरळसेवा भरतीही एमपीएससीकडे जाणार आहे. त्यामुळे आयोगाचे काम वाढणार असल्याने अध्यक्षांची जबाबदारी आणखी वाढणार आहे. अशा संकट काळात अध्यक्षपदी कोण येणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्य सरकारचे परिपत्रक काय?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाचे (दरमहा वेतन रु.२,२५,०००/- अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते) पद भरावयाचे आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या नियुक्तीची मार्गदर्शक तत्वे निश्चित करणारा दिनांक ११ सप्टेंबर, २०१९ चा शासन निर्णय शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर शासन निर्णयातील मार्गदर्शक तत्व क्र. २ (अ) व (ब) मध्ये नमूद केलेली अध्यक्ष पदासाठीची अर्हता पूर्ण करीत असलेल्या तसेच अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास वयाची ५० वर्षे पूर्ण झाली आहेत अशा इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

इच्छूक उमेदवारांनी ११ सप्टेंबर, २०१९ च्या शासन निर्णयासोबतच्या जोडपत्र-अ मधील विहित नमून्यामध्ये (आवश्यक त्या कागदपत्रांच्या तसेच १० वर्षाचे गोपनीय अहवाल/मुल्यांकन अहवालाच्या छायांकीत प्रतीसह) आपले अर्ज दिनांक २८ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत प्रत्यक्ष/कुरिअर/स्पीड़पोस्ट किंवा नोंदणीकृत डाकेने, सह सचिव, कार्या-म.लो. आ., सामान्य प्रशासन विभाग, सहावां मजला, (विस्तारित इमारत) मंत्रालय, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मुंबईः ४०००३२ यांच्या नावे सादर करणे आवश्यक आहे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे कळवण्यात आले आहे.