नागपूर : शासनाने मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेतील नियमात बदल केले आहेत. त्यानुसार रुग्णाचे छायाचित्र आता ‘जीओ- टॅग’ करूनच रुग्णालयांना सादर करावे लागेल. त्यामुळे रुग्ण केव्हा, किती वाजता, कोणत्या रुग्णालयात उपचार घेत आहे, हे अचूक कळेल. सोबतच या योजनेशी संलग्नतेसाठी रुग्णालयांतील रुग्णशय्याही आता ३० हून अधिक असायला हव्यात.

गरिबांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून ‘अँजिओप्लास्टी’, ‘बायपास सर्जरी’, कर्करोगावरील उपचार, ‘डायलिसिस’, जन्मतः मूकबधिर मुलांवर ‘कॉकलीयर इनप्लांट’, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण, रस्ते अथवा विद्युत अपघातासह भाजलेल्या रुग्णांवर उपचार, जन्मतः लहान मुलांवर हृदयशस्त्रक्रियांसाठी अर्थसहाय्य केले जाते. या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने काही बदल केले आहेत.

हेही वाचा – शिंदे सरकार ६२ हजार सरकारी शाळा खासगी कंपन्यांना देणार, बाह्ययंत्रणेकडून कंत्राटी भरतीनंतर आता शिक्षणाचेही खासगीकरण

नवीन बदलानुसार, आता मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीकरिता रुग्णालय संलग्न करण्यासाठी रुग्णालयात किमान ३० रुग्णशय्या आवश्यक आहेत. या योजनेत सहभागी यापूर्वीच्या रुग्णालयांनाही आता रुग्णशय्या वाढवाव्या लागणार आहेत. अथवा त्यांना योजनेतून बाहेर केले जाईल. रुग्णालयांना स्वत:चे ‘जीओ- टॅग’सह छायाचित्र देणे बंधनकारक आहे. संलग्न रुग्णालयांना योजनेतून अर्थसहाय्य प्रदान करण्यापूर्वी संबंधित कक्षाकडून भ्रमणध्वनीवर संपर्क केला जाईल. रुग्णाचे ‘जीओ- ट्रॅग’ छायाचित्र रुग्णालयांना पाठवावे लागेल. त्यातून रुग्ण रुग्णालयात केव्हा, कोणत्या वेळी उपचार घेत आहे, हे स्पष्ट होईल. इतरही काही नियमांत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे खासगी रुग्णालयात आधीच उपचार घेऊन नंतर पैसे लाटण्याचा प्रयत्न शक्य होणार नाही.

‘सीएमएमआरएफ ॲप’वर अर्जाची सोय

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मिळवणे आणखी सोपे झाले असून यासाठी मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासणार नाही. ‘सीएमएमआरएफ’ या ‘ॲप’वर अर्ज भरून मदत मिळवता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी दिली. या योजनेतून गेल्या १४ महिन्यांत १३ हजारांहून अधिक रुग्णांना ११२ कोटी १२ लाख रुपयांची आर्थिक मदत केल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – नागपुरात उड्डाण पुलांवरील सुसाट वाहनांना आवरा! सततच्या अपघातांमुळे सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे काम नवीन नियमांमुळे आणखी पारदर्शी होणार आहे. या नवीन नियमांची माहिती नागपुरातील नोंदणीकृत सर्व रुग्णालयांना पाठवली असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. – डॉ. रवी चव्हाण, कक्ष प्रमुख (नागपूर), मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी.