यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीचा निकाल पाहण्यापूर्वीच एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना आज, सोमवारी यवतमाळ तालुक्यातील पांढुर्णा येथे घडली.

हिना ज्ञानेश्वर आडे (१७, रा. पांढुर्णा, ता. यवतमाळ) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. हिना नेर येथील दि इंग्लिश स्कूल येथे बारावीत शिक्षण घेत होती. आज बारावीचा ऑनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. हिना हिच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने तिने आपल्या भावाला निकाल पाहण्यासाठी सांगितले होते.

भाऊ व वडील लग्नाला गेले होते. त्या ठिकाणी मोबाइलवर भावाने निकाल पाहिला. यामध्ये तीला ४७ टक्के गुण मिळाले असून ती उत्तीर्ण झाली होती. मात्र, गुण कमी मिळाल्याने भावाने तिला किती गुण मिळाले हे न सांगता, घरी आल्यावर निकाल सांगतो, असे सांगितले होते. यावरून, आपण परीक्षेत अनुत्तीर्ण झालो, असे समजून तिने घरी कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीय घरी परत आल्यावर हा प्रकार उजेडात आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

२४ तासांत दोन विद्यार्थ्यांनी मृत्यूला कवटाळले

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यात नीटचा पेपर चांगला न गेल्याने एका विद्यार्थ्याने रविवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर २४ तासातच बारावीतील विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

यवतमाळ जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८९.३४ टक्के दरम्यान, यवतमाळ जिल्ह्याचा बारावीचा निकाल ८९.३४ टक्के लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याचा निकाल ३.७१ टक्क्याने घसरला. गेल्या वर्षी जिल्ह्याची टक्केवारी ९३.०५ इतकी होती. जिल्ह्यातील १२६ परीक्षा केंद्रावर ३३ हजार ६६४ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३३ हजार ४३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात १७ हजार ९१८ विद्यार्थी  तर तर १५ हजार ५१६ विद्यार्थिनींची संख्या होती. यातील २९ हजार ८७२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण विद्यार्थ्यांमध्ये ३२ हजार ५५९ नियमित विद्यार्थी होते. तर ६१८ खासगी विद्यार्थी परीक्षेला बसले होते. नियमित परीक्षार्थ्यांचा निकाल ९०.६३ टक्के असला तरी जिल्ह्याच्या निकालाची एकूण सरासरी ८९ टक्के इतकीच आहे. यावर्षी प्रशासनाने कॉपीमुक्त अभियान, कॉपीमुक्ती सप्ताह असे अनेक उपक्रम राबविले. परीक्षा केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवला होता.