नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘अब की बार गोळीबार सरकार’ असा टोला राज्यातील भाजप सरकारला लगावला होता. त्यावर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी प्रत्युत्तर दिले. सुप्रिया सुळे सध्या घरातील भांडणात अडकल्याने त्या काहीही वक्तव्य करीत असल्याचे सावंत म्हणाले.

नागपुरातील हाॅटेल सेंटर पाॅईंट येथे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडली असून अजित पवार यांच्यासह अनेक आमदार राज्यातील महायुती सरकारमध्ये सहभागी झाले आहे. पवार कुटुंबात फुट पडली आहे. फुटीनंतर दोन्ही गट एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करीत आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी सलमान खान यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेवर भाष्य करताना सत्ताधारी पक्षावर टीका केली. अबकी बार गोळीबार सरकार, असा टोला लगावला होता. सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने पोलिस ठाण्यात केलेल्या गोळीबारानंतर ही गंभीर बाब असून अशा घटनांमुळे अब की बार गोळीबार सरकार असे वक्तव्य केले होते. त्यावर भाष्य करतांना प्रमोद सावंत म्हणाले, घरातील भांडणात फसल्यानेच सुप्रिया सुळे असे वक्तव्य करत असून त्याला गांभिर्याने घेण्याची गरज नाही.

हेही वाचा : दोनशे रुपयांसाठी पत्नीची कुऱ्हाडीने केली हत्या, आता मागितली शिक्षेत सुट; न्यायालयाने…

इंडिया आघाडीकडे सध्या ना नेते आहे, ना नेतृत्व. त्यामुळे पून्हा मोदी यांच्या हमीवर लोकांचा विश्वास वाढला. मोदी सरकारने सगळ्याच क्षेत्राचा विकास केला आहे. काँग्रेसने ५० वर्षांत जे काम केले नाही. ते मोदी सरकारने १० वर्षांत करून दाखवल्याचा दावाही सावंत यांनी केला. एक देश, एक निवडणूक हे भाजपच्या एजेंड्यावर आहे. त्यामुळे पून्हा सरकार आल्यावर सगळ्या राज्यातील सभागृहात हा प्रस्ताव मंजूर करून तो शेवटी केंद्राकडून मंजूर केले जाईल. काँग्रेस पक्ष हा जात- धर्माच्या विषयावर मत मांगतो. परंतु भाजप विकासावर मत मागत असल्याचेही सावंत म्हणाले. सध्या कुठेही अमली पदार्थ सापडल्यास त्याचे तार गोव्याशी जोडले जातात. हे चुकीचे असून गोवामध्ये दहा वर्षांपासून आमचे सरकार आल्यावर हे अवैध काम बंद असल्याचेही त्यांनी सांगितले.