नागपूर: प्रकाशाचा सन असलेल्या दिवाळीतील धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या मुहर्ताला बरेच ग्राहक सोने- चांदीमध्ये बनलेल्या देवी- देवतांच्या मुर्तीसह दागिन्यांची खरेदी करतात. या दिवसांमध्ये सोन्याचे दर उंचीवर होते. परंतु लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी (२२ ऑक्टोंबर २०२५) सोन्याच्या दर मोठ्या प्रमाणात घसरले आहे. त्यामुळे मुहर्तावर दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसु बारसला सोन्याचे दर विक्रमी उंचीवर होते. परंतु दुसऱ्याच दिवशी धनत्रयोदशीला मात्र सोन्याच्या दरात घसरण झाली. त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहर्तावर सोने- चांदीची खरेदीसाठी बाहेर बडलेल्या ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात सोने- चांदीच्या दागिन्यांमध्ये पैसे गुंतवले. परंतु लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी सोने- चांदीचे दर घसरल्याने मुहर्तावर खरेदी करतांना ग्राहकांना महागात पडलेले दिसत आहे. दरम्यान करोनानंतर सोने- चांदीचे दर नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. त्यानंतर सातत्याने सोन्याचे दर वाढत आहे.
धनत्रयोदशीला नागपुरात सोन्याचे दर कमी झाल्याने नागरिकांनी सुमारे १५० कोटींची सोने- चांदीची खरेदी केली. या दिवशी (१८ ऑक्टोंबर २०२५) धनत्रयोदशीच्या मुहर्तावर नागपुरात सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी १ लाख २८ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ लाख १९ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ लाख २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ८३ हजार ५०० रुपये होते.
हे दर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी (२१ ऑक्टोंबर २०२५) प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी १ लाख २९ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ लाख २० हजार ४०० रुपये, १८ कॅरेटसाठी १ लाख १ हजार रुपये, १४ कॅरेटसाठी ८४ हजार २०० रुपये होते. तर लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्याच दिवशी घसरून (२२ ऑक्टोंबर २०२५) सकाळी ११ वाजता प्रति दहा ग्राम २४ कॅरेटसाठी १ लाख २४ हजार ५०० रुपये, २२ कॅरेटसाठी १ लाख १५ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटसाठी ९७ हजार १०० रुपये, १४ कॅरेटसाठी ८० हजार ९०० रुपये होते. त्यामुळे हे मागील काही आठवड्यातील निच्चांकी दर आहे.
चांदीच्या दरातही मोठी घसरण…
नागपुरात धनत्रयोदशीच्या दिवशी चांदीचे दर प्रति किलो १ लाख ७० हजार ५०० रुपये होते. हे दर लक्ष्मीपूजनाला २१ ऑक्टोंबरला १ लाख ६८ हजार ७०० रुपये तर त्याच्या दुसऱ्या दिवशी २२ ऑक्टोंबरला प्रति किलो १ लाख ६३ हजार रुपये नोंदवले गेले.
